धोनीचा चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आयपीएल संचालन समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार आयपीएल संघमालकांना पाच खेळाडू कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे गतवर्षी रायजिंग पुणे संघाकडून खेळलेला धोनी पुन्हा एकदा चेन्नईच्या संघातून खेळताना दिसेल. स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई संघाला आयपीएलमधून दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. पुन्हा नव्या जोमाने चेन्नई संघ यंदाच्या हंगामामध्ये आयपीएलमध्ये उतरणार आहे. धोनीकडे संघाचे नेतृत्व सोपवले जाणार असल्याचेही आयपीएलच्या एका पदाधिकाऱयाने सांगितले. याशिवाय, या बैठकीत खेळाडू कायम ठेवण्याचे धोरण, वेतन, खेळाडूंसाठीचे नियम व अन्य मुद्यावर चर्चा झाली. संचालन समितीने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी अर्थसंकल्पात 66 ऐवजी 80 कोटींची तरतुद केली आहे.