|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोयनेच्या विनाशकारी भूकंपाची 50 वर्षे

कोयनेच्या विनाशकारी भूकंपाची 50 वर्षे 

शहर प्रतिनिधी/ पाटण

कोयनानगर, कराड तालुका आणि पाटण तालुक्यात 11 डिसेंबर 1967 पहाटे रोजी भूकंपाचा मोठा धक्का बसला. त्यात शेकडो लोक मृत्युमुखी पडले. हजारो संसार उद्ध्वस्त झाले. हजारो घरे जमीनदोस्त झाली. या नैसर्गिक आपत्तीला येत्या 11 डिसेंबर 2017 रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. तरीही कोयना प्रकल्पग्रस्त व कोयना भूकंपग्रस्तांचे संपूर्ण पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. त्यासाठी जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला खडबडून जागे करण्यासाठी कोयनानगर येथे 11 डिसेंबर रोजी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिली

विक्रमसिंह पाटणकर म्हणाले की, कराड जिमखाना या संस्थेच्या वतीने कोयनानगर येथे 11 डिसेंबर रोजी नेताजी सुभासचंद्र बोस हायस्कूलमध्ये दुपारी 3 वाजता लोकप्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील, कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहानंतर कँडल मार्च त्याच हायस्कूलपासून निघणार असून त्याचा समारोप भूकंपात मृत्यू पावलेल्यांना श्रध्दांजली वाहून होईल.

कोयना भूकंपाला 50 वर्षे पूर्ण होताना रौप्य किंवा सुवर्ण महोत्सवासारखा उत्सव आम्हाला साजरा करायचा नाही, असे प्रारंभीच स्पष्ट करून ते म्हणाले, या पन्नास वर्षात एकुणच पुनर्वसनाच्या पातळीवर काय झाले? काय राहिलेय? याचा अभ्यास व पूर्ण मागोवा घेऊन हे प्रश्न कायमचे निकाल काढण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आवश्यकता शासनाला विधी मंडळातील लोकप्रतिनिधींना शासकीय अधिकाऱयांना पटवून देण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता आहे. कोयना भूकंपबाधित लोकांचे आणि भूकंपप्रणव क्षेत्राचे नेमके पूनर्वसन काय, आणि कसे होणे आवश्यक आहे, याचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा. त्यातून योग्य आणि आवश्यक कामे कोणती, हे निश्चित होईल. सततच्या भूकंपामुळे व अतिवृष्टीमुळे खूप घरे कमकुवत झाली आहेत. या कमकुवत घरांची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. ज्या बाधित गावांचे पुनर्वसन झाले आहे, तेथे जरी ज्या 18 सुविधा देणे आवश्यक आहे, त्या दिल्या गेल्या आहेत का, किती दिल्या गेल्या आहेत, किती देणे शिल्लक आहेत, किती बंद पडल्या आहेत, याचाही मागोवा घेऊन त्या त्या पुनर्वसित गावांना त्या सोईसुविधा पुरवण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करावा लागणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड येथे भूकंप विज्ञान प्रयोगशाळा उभी करण्यात येत आहे, त्याच्यासाठी 400 कोटी रूपयांची तरतुदही करण्यात आली आल्याचे सांगून पाटणकर म्हणाले, या प्रयोगशाळेच्या वतीने चांदोली, कोयना व रासाटी येथे भूगर्भात 2 तर 3 किलोमीटर खोल विवरे घेण्यात आली पण त्यानंतर हे कामच थांबले आहे. ही योजना पूर्ण झाल्यानंतर भूभर्गातील हालचालीची माहीती मिळेल. भूकंपाची आगाऊ सूचना मिळू शकेल. असे झाले तर जगातील हा पहिलाच यशस्वी प्रयोग ठरेल.

कोयना भूकंप पूनर्वसन निधी समिती न्यास हा प्रामुख्याने भूकंपामुळे बाधित झालेल्या दुर्गम भागातील गोरगरीब लोकांची खिळखिळी झालेली घरे बांधण्यासाठी मदत करणारी यंत्रणा आहे. कायद्याने आणि न्यासाच्या तरतुदीप्रमाणे हा निधी कुठे आणि कसा वापरायचा, याचे स्पष्ट निर्देश आहेत. या निधीचा वापर जबाबदारीने योजनापूर्वक करणे आवश्यक आहे. कोयना भूकंप पूनर्वसन निधी हा सरसकट सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत असलेल्या कामांना खर्च केला जात आहे, याची जाणीव शासनाला सरकारी अधिकाऱयांना करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे विक्रमसिंह पाटणकर यांनी सांगितले.

 

Related posts: