|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी मार्केटात शुकशुकाट

मासळी मार्केटात शुकशुकाट 

प्रतिनिधी/ मडगाव

ओखी वादळाचा प्रभाव मंदावला असला तरी प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात जाण्यास मनाई केल्याने, सद्या मासळी मार्केटात शुकशुकाट पसरला आहे. गेले तीन दिवस गोवेकर मासळीविना दिवस घालवत आहेत. काहींना तर सक्तीने शाहाकारी व्हावे लागले आहे. सद्या मासे मिळत नसल्याने सुकी मासळी व चिकन-अंडी तसेच मटण याला मागणी वाढली आहे.

मडगावचे घाऊक मासळी मार्केट हे संपूर्ण गोव्याला मासळी पुरविणारे प्रमुख मार्केट आहे. भल्या पहाटे तीन वाजल्यापासून या ठिकाणी केरळ, तामिलनाडू, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून मासे येतात. पण, ओखी वादळामुळे परराज्यातून येणारे मासे बंद झाल्याने, या प्रमुख मार्केटातच शुकशुकाट पसरला आहे. सद्या ओखी वादळ गुजरातकडे सरकल्याने तसेच गोवा, कर्नाटक, तामिळनाडू व केरळ मधील वादळाचा परिणाम मंदावल्याने पुढील दोन दिवसात पुन्हा मासेमारीला प्रारंभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गोव्यात पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱया मासेमारीवर थोडय़ा प्रमाणात गरज भागत असली तरी हे मासे हातोहात विकले गेल्याने अनेकांना चिकन, अंडी व मटणचा आधार घ्यावा लागला. पारंपारिक पद्धतीने कोळंबी तसेच तिसऱया, कालवा, खेकडे तसेच खाडीत मिळणारे मासे बाजारपेठेत आले, मात्र ते सर्वांची गरज पूर्ण करू शकले नसल्याची माहिती मडगावच्या एसजीपीडीए मार्केटातील विक्रेत्यांनी दिली. सुक्या मासळीची विक्री मात्र जोरात होत असल्याचे आढळून आले.

Related posts: