|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अपुऱया निधीमुळे प्राथमिक शाळा दुरूस्ती रखडली

अपुऱया निधीमुळे प्राथमिक शाळा दुरूस्ती रखडली 

रत्नागिरी तालुक्यात 44 शाळा दुरूस्तीच्या प्रतीक्षेत

महावितरणचा वीज खांब दुरूस्तीकडे पाठपुराव्यानंतरही कानाडोळा

जागांअभावी अंगणवाडी इमारतीचे प्रस्ताव रद्द

 

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या दुरूस्ती निधीच्या कात्रीत सापडल्या आहेत. तालुक्यातील 44 प्राथमिक शाळांची दुरूस्ती होणे आवश्यक असताना त्या दुरूस्तीला पुरेशा निधीची तरतूद नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत आहे. धोकादायक बनलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची बाब पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी उपस्थित केली आहे.

पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत तालुक्यातील प्राथमिक शाळांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित सदस्यांनी शाळांची वस्तूस्थिती कथन केली. गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांनी मोडकळीस आलेल्या तालुक्यातील प्राथमिक शाळांची यादी सभागृहासमोर सादर केली. त्यामध्ये 44 प्राथमिक शाळांचा समावेश आहे. कोळंबे, शीळ, मिरजोळे, उक्षी, भोके, निवळी, फिशरीज शासकीय शाळा, करबुडे, लाजूळ, निवेंडी, वाटद खंडाळा, नाणिज, पूर्णगड, वेतोशी, टीके, कोंडवी, कोतवडे, जांभरूण या गावांतील बहुतांश शाळांचा समावेश आहे.

शाळांच्या दुरूस्तीसाठी निधीची तरतूद कमी असल्याने हा प्रश्न उभा ठाकलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी शाळांची दुरूस्तीची कामे डीपीसी व जिल्हा परिषद सेसमधून घेण्यासाठी यादी सादर करण्यात यावी, असे सांगण्यात आले. वळके येथील इयत्ता 7 वीपर्यंत असलेल्या शाळेची दुरूस्ती रखडलेली आहे. या शाळेतील वर्ग 2 वर्गखोल्यांमध्ये भरतात. अशा या धोकादायक शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सदस्य उत्तम सावंत यांनी उपस्थित केला. शाळा दुरूस्तीच्या पुरवणी यादींमध्ये वळके शाळेचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

महावितरणच्या कारभारावरही या सभेत सदस्यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. गावांमधील खराब झालेले वीज खांब बदलण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱयांना वारंवार भेटून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र अजूनही हे खराब खांब बदलण्यासाठी दखल घेतली गेलेली नसल्याचे सभापती मेघना पाष्टे यांनी सांगितले. तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना पाष्टे यांनी महावितरणच्या अधिकाऱयांना केल्या आहेत. कासारवेली येथे खराब वीज खांब रस्सीने बांधून ठेवण्याची वेळ आलेली असल्याचे सदस्य गजानन पाटील यांनी सांगितले. खरवते गावात मेन वीज वाहिनी हाताला लागेल, एवढय़ा अंतरावर असल्याने अपघाताचा धोका असल्याचे सांगण्यात आले.

कोतवडे येथे लोकांना सोयीस्कर असलेले वीज कार्यालय खरवते येथे सडय़ावर नेण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे पाटील यांनी सांगितले. शिवारआंबेरे, गुरूमळी आदी भागातही नादुरूस्त वीज खांबाची समस्या कायम असल्याची बाब सदस्यांनी मांडली. तालुक्यात अंगणवाडी इमारतीचा प्रश्न खितपत पडला आहे. अंगणवाडी इमारत बांधकामाचे 20 प्रस्ताव आहेत. त्यापैकी सुमारे 7 कामे जागांअभावी रद्द करण्याची नामुष्की बालकल्याण विभागावर आली असल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातील गोळप गावात डेंग्यूची साथ सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून या सभेत सांगण्यात आले. पण या साथीच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणासाठी 3 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

यांत्रिकीकरणाचे सर्वाधिक पैसे शेतकऱयांच्या खात्यावर जमा

उन्नत शेती व समृध्द शेतकरी अभियानांतर्गत सन 2017-18 अंतर्गत यांत्रिकीकरणासाठी रत्नागिरी जिल्हय़ाला 4 कोटीचा निधी प्राप्त झाला. त्या निधीचा लाभ शेतकरी लाभार्थ्यांना देण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक निधी शेतकऱयांच्या खात्यांवर जमा करण्यात आल्याचे कृषी विभागाचे अधिकारी पाटील यांनी सांगितले. तालुक्यात 503 शेतकऱयांकडून पूर्वसंमती देण्यात आली. यांत्रिकीकरणाचा लाभ घेतलेल्या शेतकऱयांच्या खात्यावर 90 लाखाचा निधी जमा केल्याचे सांगितले.

वेतोशीत पायलागाची साथ आटोक्यात

वेतोशी गावांमध्ये गुरांना पायलाग साथीने ग्रासले होते. तेथील 22 जनावरांना या रोगांची लागण झाल्याची बाब पशू संवर्धन विभागाच्या सर्वेक्षणात दिसून आले. या साथीच्या पार्श्वभूमीवर 280 जनावरांना लसीकरण करण्यात आले. जनावरांना मोकाट सोडण्यात आल्याने या साथीचा प्रार्दूभाव झाला होता. त्या ठिकाणी या आजारामुळे कोणतीही गुरे दगावलेली नाहीत. बबन झोरे यांच्या एका म्हैशीचा झालेला मृत्यू हा जंगलात पडून झाल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱयांनी दिले आहे. आता या गावातील साथ आटोक्यात असल्याचे सांगण्यात आले.