|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अवघा आनंदी आनंद

अवघा आनंदी आनंद 

नंदबाबाच्या दोन बहिणी होत्या. मोठय़ा बहिणीचे नांव होते नंदा आणि धाकटीचे नांव होते सुनंदा. आता जेव्हा नंदा आणि सुनंदाला ही बातमी समजली की यशोदा गरोदर आहे, तेव्हा त्या दोघीही सहा महिने अगोदरच गोकुळात मुक्कामाला आल्या. या नणंदा वाटच पाहत होत्या की भावजयीकडे काही असे काम निघावे की आपल्याला वहिनीची खूप सेवा करायला मिळावी, मग काय, मेवाच मेवा मिळेल. हा सगळा खुशीचा मामला होता. नणंद भावजयीचा हास्य विनोदाचाही मामला होता.

दोघीही बहिणी वहिनीच्या सेवेची एकही संधी वाया घालवत नसत. सेवा करायची इतकी तत्परता कशी काय? कारण नंदराणी यशोदेच्या गळय़ात एक बहुमूल्य हार आहे. नवरत्नांचा हार! दोघीही मनात विचार करतात की वहिनी मोठी उदार मनाची, प्रेमळ आहे. वहिनीला मुलगा झाला की हार मलाच तर मिळायला हवा, आणखी कुणाला कसा मिळेल? दोघीही टपून बसल्या आहेत.

आता नवमीला सकाळी सुनंदाच्या मनात विचार आला की वहिनी तर दररोज पहाटे किती लवकर उठते, आज अजून का नाही उठली? सुनंदा धावत धावत यशोदेच्या शेजघरात शिरली. बघते तो काय! नंदराणी शांत झोपली आहे आणि कुशीत झोपले आहे, एक छोटेसे बाळ! सुनंदाने लगेच एकवीस वेळा भगवंताच्या नामाचा जप केला. हे विधात्या! अखेर तू आमच्या सगळय़ांच्या मनीची प्रार्थना ऐकलीस. परंतु यशोदेच्या कुशीत झोपलेल्या बालकाने हलकेसे पांघरूण डोक्मयावरून ओढून घेतले होते.

सुनंदाने हलकेच बाळाच्या तोंडावरचे पांघरूण ओढून पाहिले आणि पुन्हा पांघरूण झाकून ठेवले. कशाला? न जाणो पण मुलगी असेल तर! मुलगी असायलाही काही हरकत नाही. पण मग तो नवरत्नांचा हार मिळेल याची खात्री नाही. सुनंदाने पुन्हा हलकेच बाळाच्या चेहऱयावरची चादर काढली. खात्री करून घेतली की मुलगाच आहे. पुन्हा चादर झाकली. सुनंदाचा आनंद गगनात मावेना. धावत ती अंगणात आली आणि थाळी वाजवू लागली. धावत धावत ती गोशाळेत नंदबाबांपाशी पोहोचली आणि बोलली-दादा! अभिनंदन दादा! नंदबाबा म्हणाले-अगं कसलं अभिनंदन? कशाबद्दल अभिनंदन? सांग तर खरं, असं घडलंय तरी काय? सुनंदा म्हणाली-आधी सांग दादा, मला काय देशील? नंदबाबा म्हणाले-चल! तू मागशील ते देईन. आता सांग तर खरं, मामला काय आहे? सुनंदा म्हणाली-दादा! आपली सारी तपस्या, व्रतवैकल्य आज फळाला आली. आज भगवान आपल्यावर, साऱया गोकुळावर प्रसन्न झाले. मुलगा झाला! दादा, यशोदा वहिनीला मुलगा झाला! ही वार्ता ऐकताच वृद्ध नंदबाबा एकदम तरुण झाले. आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी त्यांची अवस्था झाली. त्यांनी प्रेमाने आपल्या बहिणीला मिठीच मारली. नंदबाबा, यशोदेला पुत्र झाला ही बातमी हा हा म्हणता गोकुळात पसरली. किती वर्षे गोकुळ या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते! अवघा आनंदी आनंद झाला.

Related posts: