|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पालिकेत सीओंनी घेतलेल्या बैठकीचे गौडबंगाल काय?

पालिकेत सीओंनी घेतलेल्या बैठकीचे गौडबंगाल काय? 

प्रतिनिधी /सातारा :

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनाच पालिकेचे कर्मचारी ऐकत नाहीत. त्यामुळे शहरात सोयी सुविधा देताना अडचणी निर्माण होत असल्याने त्यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. सर्व विभागप्रमुखांना सूचनाही दिल्या गेल्या. त्यानुसार त्यांच्या या अचानक घेतलेल्या बैठकीमागे गौडबंगाल काय? असा सवाल सातारकरांमधून उपस्थित होवू लागला आहे. दरम्यान, पालिकेच्या निम्म्याहून अधिक कर्मचाऱयांकडे स्वच्छतेचे ऍपही नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हे ऍप डाऊनलोड करा. असे सांगण्यासाठी साताऱयातील एका महाविद्यालयाला ठेका दिल्याचे समजते. यावरुन पालिकेचा कारभार म्हणजे उंटावरुन शेळय़ा हाकण्याचाच प्रकार सुरु असल्याची टीका होवू लागली आहे.

केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान आणि इतर योजना राबवण्याबाबत स्पष्ट निर्देश पालिकांना दिले आहेत. त्यातच स्वच्छतेचे ऍपही प्रत्येकाच्या मोबाईलवर असावे असे सांगण्यात आले. त्यानुसार पालिकेच्या कर्मचाऱयांच्या मोबाईलवर ते ऍप नसल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने मुख्याधिकारी शंकरराव गोरे यांनी बुधवारी सर्व खातेप्रमुखांची बैठक बोलवली. सातारा पालिकेचे घसरत असलेले रँकींग कसे पुढे आणायचे यावर स्पष्ट सूचना दिल्या. त्यानुसार बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भाऊराव पाटील, सुधीर चव्हाण, प्रदीप साबळे, नगर विकास विभागातील आष्टीकर, आरोग्य विभागाचे शिवदास साखरे, वसुली विभागाचे जाधव यांच्यासह सर्वांनाच बोलवून गोरे यांनी स्पष्ट सूचना दिल्याचे समजते. मात्र, सातारा पालिकेच्या कर्मचाऱयांकडेच जर ऍप नसेल तर स्वच्छतेमध्ये रँकींग कसे सुधारेल, असे कयास बांधत पालिकेच्या या बैठकीत प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ऍप असले पाहिजे, अशा सूचना दिल्याचे समजते. त्यानुसार कार्यवाहीही सुरु झाल्याचे समजते.