|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शौचालय दुरुस्ती घोटाळा आज स्थायीत गाजणार

शौचालय दुरुस्ती घोटाळा आज स्थायीत गाजणार 

प्रतिनिधी /सोलापूर :

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीवर स्थायीच्या मान्यतेशिवाय करण्यात आलेल्या तीन कोटी 12 लाखांच्या खर्चात घोटाळा झाल्याच्या चौकशीस विलंबाचे प्रकरण शुक्रवारी होणाऱया स्थायी समितीच्या सभेत गाजण्याचे संकेत स्थायी सभापती संजय कोळी यांनी दिले आहेत. घंटागाडीवरील कामगारांना किमान वेतनाच्या प्रस्तावावरही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत स्थायीच्या कार्यालयात काथ्याकूट सुरु होता.

  स्थायी समितीच्या मान्यतेशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीसाठी तातडीने तीन कोटी 12 लाखांचा खर्च करण्यात आला होता. याप्रकरणाचा सविस्तर खर्च तपशीलवार सादर करण्याचे आदेश चार महिन्यापूर्वी स्थायी समितीच्या सभेत देण्यात आले होते. परंतु याप्रकरणी संशयास्पद वातावरण दिसल्याने स्थायी सभापती यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

चार महिने झाले तरी चौकशी होत नसल्याने यातील संशय बळावत आहे. अतिरीक्त आयुक्तांकडून चौकशी अंतिम टप्प्यात असून 1 ते 8 झोनचे सर्व अहवाल एकत्रित करण्याचे काम सुरु असल्याचे गुरुवारी बोलताना सांगितले. यावर स्थायी सभापती कोळी यांना विचारले असता ते म्हाणाले की, आज शुक्रवारी होणाऱया स्थायी सभेत हा विषय घेणार आहे.

दरम्यान प्रशासनाकडून घंटागाडीवरील कामगारांना किमान वेतनासाठी आलेल्या प्रस्तावाबाबत संदिग्धता निर्माण झाल्याने स्थायी सभापती, स्थायीतील पक्षनेते, सदस्य आणि मुख्य सफाई अधीक्षक यांच्यात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत काथ्याकूट सुरु होता.

Related posts: