|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भुजबळांच्या फक्त 29 कोटींच्या मालमत्तेचा हिशेब कसा ?

भुजबळांच्या फक्त 29 कोटींच्या मालमत्तेचा हिशेब कसा ? 

प्रतिनिधी /मुंबई :

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या बेहिशोबी मालमत्तेमधून फक्त 29 कोटींचा हिशोब कसा लागतो, असा सवाल ईडीच्यावतीने गुरुवारी मुंबई सत्र न्यायालयात विचारला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन आणि मुंबईतील कालिना येथील बांधकामांत भ्रष्टाचार केल्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर आहे. सक्तवसुली संचालनालयाने 14 मार्च 2016 मध्ये त्यांना अटक केली असून मुलगा पंकज आणि पुतण्या समीरदेखील त्यात सहआरोपी आहेत. संचालनालयाच्या नवीन कारवाईमुळे भुजबळांच्या आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य 178 कोटी रुपये झाले आहे. त्यात मुंबई, नाशिक आणि पुण्यातील फ्लॅट्स, बंगले, कार्यालये अशा  मालमत्तांचा समावेश आहे. ही मालमत्ता काळा पैसा बाळगल्यासंदर्भातील कायद्यातंर्गत जप्त केली आहे. कलम 45 हे सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर या कायद्यान्वये जामीन मिळविण्यासाठी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यासंदर्भात न्यायमूर्ती एम. एस. आझमी यांच्यासमोर सुनावणी सुरू असून ईडीच्यावतीने सध्या न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. या प्रकरणात 847 कोटींचा गैरव्यवहार करण्यात आला असून त्यातील फक्त 29 कोटींचा हिशोब मिळत असल्याचे ईडीच्यावतीने ऍड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयात स्पष्ट केले. तसेच स्थापन करण्यात आलेल्या कंपन्या मुले, सुनांच्या नावावर असल्याचेही त्यांनी न्यायालायत सांगितले. यावर पुढील युक्तिवाद शुक्रवारी पुन्हा होणार आहे.

Related posts: