|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेची ड्रोन विमाने पाडा

अमेरिकेची ड्रोन विमाने पाडा 

इस्लामाबाद / वृत्तसंस्था :

अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी पाकिस्तानच्या भूमीत हल्ला केल्यास ही विमाने पाडविण्यात यावीत, असा आदेश पाक लष्करी अधिकाऱयांनी दिला आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक आहे, असा अभिप्राय अमेरिकेने नुकताच व्यक्त केला होता.

आपल्या देशातील दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यात पाकिस्तानकडून टाळाटाळ चालू आहे. याचा साऱया जगाला त्रास होत आहे. त्यामुळे पाकिस्तानातील दशहतवादी तळांवर आता अमेरिका स्वतःच ड्रोनच्या साहाय्याने हल्ले चढविणार आहे, अशी घोषणाही अमेरिकेने केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकने आता अमेरिकेलाच इशारा देण्याची शिरजोरी दाखविली आहे.

इशारे नेहमीचेच

पाकने ड्रोन पाडविण्याचा इशारा दिला असला तरी प्रत्यक्षात तसे करण्याची त्याची क्षमता आहे काय असा प्रश्न विचारला जात आहे. कारण, अमेरिकेच्या प्रत्येक ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तानने हा इशारा दिला आहे. पुन्हा असे हल्ले आमच्यावर करू नका, अशी निषेधात्मक सूचनाही पाक प्रत्येकवेळी करतो. तथापि, आजपर्यंत अमेरिकेचे एकही ड्रोन त्याला पाडता आलेले नाही. त्यामुळे ताजा इशारा ही केवळ दर्पोक्ती असल्याचेही अनेक तज्ञांचे मत आहे.

आजपर्यंत असंख्य ठार

आजपर्यंत अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकच्या असंख्य दहशतवाद्यांना प्राण गमवावे लागले आहेत. शेकडो नागरीकही ठार झाले आहेत, असे पाकचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याची आजवर पाकिस्तानला मदतच झाली आहे. कारण पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये पाक प्रशासनाचे राज्य नाही. तेथे दहशतवाद्यांचेच राज्य आहे. अशा स्थितीत त्यांचा बिमोड करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ड्रोन हल्ले हाच आहे, अशी स्थिती असताना पाक अमेरिकेची विमाने पडविण्याचा आदेश प्रत्यक्षात आणू शकणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.

Related posts: