|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आगोंदमधील वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार

आगोंदमधील वीज, पाणी व रस्त्यांच्या समस्या प्राधान्यक्रमाने सोडविणार 

वार्ताहर/ खोल

आगोंद पंचायत क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत असून वीज, पाणी व रस्ते यांच्याशी निगडीत समस्या प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येतील, असे काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येत आहेत. तसेच वीज समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आगोंद पंचायत कार्यालय, मड्डी, धवलखाजन सरकारी प्राथमिक शाळा, दिवानबाग-बेतूल व मुडकूड येथे नवीन ट्रान्सफॉर्मर्स बसविण्यात यावेत याकरिताही आपण प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आगोंद पंचायत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी स्थानिक आमदार फर्नांडिस यांनी आयोजित केलेला जनता दरबार नुकताच भुरीम येथील सभागृहात झाला. यावेळी आमदारांसमवेत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता श्रीकांत धोंड, कार्यकारी अभियंता मॅथ्यू, काणकोणचे साहाय्यक अभियंता लेस्टर फर्नांडिस, कनिष्ठ अभियंते दीपराज मडकईकर, साहाय्यक अभियंता ए. अब्रांची, कनिष्ठ अभियंता शरद वेर्णेकर, वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता गोविंद भट, संजय नाईक तसेच आगोंदचे सरपंच प्रमोद फळदेसाई, उपसरपंच आबेल बोर्जिस, पंच बरसात ना. गावकर, मंदिरी वेळीप, शिल्पा पागी व टिपू पागी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.

चापोलीचे पाणी वळविण्याची मागणी

आगोंद पंचायत क्षेत्रात पाण्याची समस्या अत्यंत जटील बनली असून दिवसातून दोन तासही पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे चापोली धरणाचे पाणी धवलखाजन, वाल तसेच अन्य भागांमध्ये उपलब्ध करावे, अशी मागणी सॅबेस्त्यांव फर्नांडिस, विवेकानंद गावकर, आग्नेल फर्नांडिस यांनी केली. पाण्याची बिले अनियमित पद्धतीने येत असून वाल भागातील काही नागरिकांना पाण्यासाठी व्यावसायिक दर आकारला जात आहे. काही शॅकचालक घरातील मीटरच्या आधारे पाण्याचा वापर करत आहेत. त्यामुळे धवलखाजन व वाल भागांतील सर्व घरांचे आणि आस्थापनांचे पाणीपुरवठा विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी नागरिकांकडून याप्रसंगी करण्यात आली. शेखर पागी, विनोद फळदेसाई, संजय पागी यांनीही विविध सूचना मांडल्या.

हंगामापुरता व्यावसायिक दर आकारावा

काही घरांमध्ये पर्यटकांना भाडय़ाने खोल्या देण्यात येत असून पर्यटकांना जादा पाण्याची आवश्यकता असते. याबाबतीत व्यावसायिक दर लागू करताना तो दर केवळ पर्यटन हंगामापुरता आकारावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. परंतु खोल्या भाडय़ाने देणारे घरमालक स्वतःहून पुढे सरसावत नसल्यामुळे पाण्याच्या बिलांचा घोळ होतो. त्याशिवाय पाणीपुरवठा विभागाने जारी केलेल्या नोटिसीला कुणाकडूनही उत्तर आलेले नाही, याकडे सदर विभागाच्या अधिकाऱयांनी लक्ष वेधले. अशा घरमालकांनी पंचायतीचा महसूल बुडविणे योग्य नसल्याचे मत याप्रसंगी व्यक्त झाले.

नाताळापूर्वी सुधारणांची मागणी

पंचायत क्षेत्रातील जुने वीजखांब व वाहिन्या बदलण्याची आवश्यकता असून वरचेवर खंडित होणाऱया वीजपुरवठय़ामुळे व्यावसायिक व अन्य नागरिक संतप्त झालेले आहेत. नुकतीच करण्यात आलेली एलईडी दिव्यांची व्यवस्था देखील निकृष्ट आहे, असे उपस्थित नागरिकांकडून सांगण्यात आले. मिरांदवाडा, काराशीरमळ, मुडकूड येथील रस्ते व वीज व्यवस्था नाताळापूर्वी सुरळीत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

उपसरपंच बोर्जिस यांनी स्वागत केले. पंचायतीच्या वतीने आगोंदातील वीज, पाणी व रस्ताविषयक समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न आणि  मंजुरीसाठी अडलेली कामे यांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. पुढील जनता दरबार सहा महिन्यांनंतर सर्व खातेप्रमुखांना घेऊन भरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार फर्नांडिस यांनी दिली.