|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बुलडाणा अर्बनने अतिरीक्त शेतीमाल खरेदी करावा

बुलडाणा अर्बनने अतिरीक्त शेतीमाल खरेदी करावा 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

प्रतिनिधी/कोल्हापूर

 यंदा सर्वच शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाल्याने व्यापारी दर पाडून शेतकऱयांचा माल खरेदी करत आहे. यामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सरकारने नवीन योजना सुरु केली आहे. यामध्ये राज्यातील मोठय़ा सामाजिक संस्थांना अतिरिक्त शेतीमाल खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खरेदी केलेला शेतीमाल विकून जो नफा मिळेल तो संस्थांचा आणि जरी यातून संस्थांचे नुकसान झाले तर त्या संस्थेला सरकार नुकसान भरपाई देणार आहे. बुलडाणा अर्बन सोसायटीचे समाजिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. सोसायटीची उलाढाल ही मोठी आहे. त्यामुळे बुलडाण अर्बनने एखाद्या जिल्हय़ातील शेतकऱयांचे उत्पादन खरेदी करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी केले.

  बुलडाणा अर्बन क्रेडीट को-ऑप. सोसायटी तर्फे सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱया मान्यवरांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. सत्कार समारंभास महापौर स्वाती यवलुजे, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, लक्ष्मीकांत मर्दा, बुलडाणा अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे प्रमुख उपस्थित होते. यावेळी हेल्पर्स दी हॅण्डीकॅप्डच्या डॉ. नसिमा हुरजुक, स्वयंसिद्धा संस्था,आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू सुवर्णकन्या तेजस्वीनी सावंत, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद आदींचा मान्यवरांच्या हस्ते धनादेश व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच जिवरक्षक दिनकर कांबळे यांनाही 2 लाख रुपये किमतीचे स्कुबा डायव्हींग किट देवून गौरविण्यात आले.

  पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, बुलडाणा अर्बन सोसायटीचा व्यवहार एखाद्या सहकारी बॅकेपेक्षाही मोठा आहे. त्यांनी ज्या व्यक्तींचा गौरव केला आहे त्यांचे समाजिक कार्यातील योगदान कौतुकास्पद आहे. या सत्कारमुर्तींनी केलेल्या सामाजिक कार्यावर एक पुस्तक प्रकाशित होवू शकते आणि हे पुस्तक नक्कीच अन्य सामाजिक कार्यकर्ते व संस्थांना मार्गदर्शक ठरणार आहे.

 शेतीविषयक बोलताना ते पुढे म्हणाले, शेतीमालाच्या उत्पादनामध्ये यंदा दुपटीने वाढ झाली आहे. 40 हजार कोटी रुपयांचे अतिरीक्त उत्पादन झाले आहे. हे अतिरीक्त उत्पादन सरकारला खरेदी करणे शक्य नाही. कापूस, तुरीचे उत्पादन दुपटीने वाढले आहे. शेतकऱयांचे नुकसान होवू नये याकरीता सरकारने 72 लाख क्विंटल अतिरीक्त तुर खरेदी केली आहे. पण याप्रमाणे सर्वच अतिरीक्त शेतीमाल खरेदी करणे शक्य नसल्याने बुलडाणा सारख्या संस्थांनी हा शेतीमाल खरेदी करुन शेतकऱयांना सक्षम बनवावे, जेणेकरुन ऊस उत्पादक शेतकऱयांप्रमाणे अन्य पिकांचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांनाही ताट मानेने समाजात वावरता येईल. यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तरी बडय़ा संस्थांनी एखादा जिल्हा दत्तक घेवून तेथील अतिरीक्त उत्पदान खरेदी करावे, व सरकारच्या नव्या योजनेला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.

  दिनकरसाठी नवीन घर खरेदी करणार : पालकमंत्री पाटील

  स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता संकटात सापडलेल्या अनेक नागरिकांना दिनकर कांबळेने जीवनदान दिले आहे. अशांसाठी दिनकर एक देवदूत आहे. तसेच नदी, तलाव, विहीर आणि खोल दऱयांमधील सडलेले अनेक मृतदेह दिनकरने बाहेर काढले आहेत. त्याचबरोबर रात्री अपरात्री तो अनेकांच्या मदतीला धावून गेला आहे. असा हा मोठा माणूस आज एका साध्या झोपडीत राहत आहे. त्यामुळे दिनकरला त्याचे स्वतःचे खर खरेदी करुन देणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच दिनकरचे घर उभारण्यासाठी ज्यांन मदत करण्याची इच्छा आहे अशा नागरिकांनी 8 दिवसाच्या आत धनादेश द्यावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानुसार लक्ष्मीकांत मर्दा आणि गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे यांनी प्रत्येकी 51 हजार रुपयांची मदत जाहीर केली.