|Thursday, June 27, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आधारच्या नादात वीरपत्नीचा मृत्यू

आधारच्या नादात वीरपत्नीचा मृत्यू 

हरियाणातील धक्कादायक प्रकार : हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला संताप

वृत्तसंस्था/  सोनीपत

आधार कार्डला विविध आवश्यक सेवांशी संलग्न करण्याच्या भानगडींमध्ये जीव गमाविणाऱयांच्या यादीत आता एका वीरपत्नीचे (हुतात्म्याची पत्नी) नाव सामील झाले. हरियाणाच्या सोनीपतमध्ये आधारकार्ड आणि कायदेशीर प्रक्रियेमुळे कारगिल युद्धात हुतात्मा झालेले हवालदार लक्ष्मण दास यांची पत्नी शंकुतला देवी यांना वेदनेने तडफडत जीव गमवावा लागला. रुग्णालयाने याप्रकारचा आरोप फेटाळला असला तरीही या घटनेनंतर देशाच्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप पसरला आहे.

जे घडले, त्यावर माझा विश्वासच बसत नाही, मला माझ्या कुटुंबाची चिंता होतेय. ईसीएचएस सुविधा आहे, परंतु ती आधारशी संलग्न करणे आणि त्याची प्रती जमा करण्याचा नियम बेकार असल्याचे उद्गार हुतात्मा मेजर सी.बी. द्विवेदी यांच्या कन्येने काढले. कारगिल युद्धात वीरमरण पत्करावे लागलेले विजयंत थापर यांचे वडिल व्ही.एन. थापर यांनी हे लाजिरवाणे वृत्त ऐकून धक्काच बसल्याचे म्हटले. मानवी जीवनाबद्दल आम्ही उदासीन झालो आहोत. अशा घटनांमुळे सशस्त्र दलांचे मनोबल कमी होते असेही ते
म्हणाले.

शकुंतला देवी अनेक दिवसांपासून आजारी होत्या. सोनीपतच्या टय़ूलिप रुग्णालयात त्यांना दाखल करण्याचा प्रयत्न त्यांचा मुलगा पवनने केला. यासाठी शंकुतला देवींना सैन्याच्या स्थानिक कार्यालयातून पत्र देण्यात आले, परंतु आधार कार्ड उपलब्ध नसल्याने रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला.

डॉक्टरांनी ऐकूनच घेतले नाही

रुग्णालयातील डॉक्टरांनी शंकुतला देवींकडे आधारकार्डची मागणी केली. त्यावेळी आधारकार्ड जवळ नसल्याने त्यांच्या मुलाने व्हॉट्सऍपवरील आधारकार्डचे छायाचित्र मागवून ते दाखविले. त्यांनी मूळ प्रत जमा करण्याचे आश्वासन देखील दिले, परंतु डॉक्टरांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. काही वेळानंतर रुग्णालय व्यवस्थापनाने आधारकार्ड नसेल तर रुग्णाला येथून न्या अशी सूचना केली. यावर पवनने रडत रडत आपली आई कारगिल हुतात्म्याची विधवा असल्याचे डॉक्टरांना सांगितले, याचा देखील रुग्णालयावर कोणताही परिणाम झाला नाही.

रुग्णालयाने फेटाळला आरोप

या पूर्ण प्रकरणी टय़ूलिप रुग्णालयातील डॉक्टर अभिमन्यू कुमार यांनी शकुंतला देवी यांच्यावर उपचार सुरू केले होते असा दावा केला. रुग्णालयात त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीनुसार भरती करण्याचा प्रयत्न होतो, परंतु शंकुतला देवींना भरती केल्यावर त्यांचे नातेवाईक त्यांना दुसऱया ठिकाणी घेऊन गेले असेही डॉक्टरांनी म्हटले.

वेदनेने तडफडल्या

या सर्व घडामोडीदरम्यान शंकुतला देवी वेदनेने तडफडत होत्या. जवळपास दीड तासांपर्यंत वाद चालला. यानंतर पवनने त्यांना पुन्हा सैन्याच्या स्थानिक कार्यालयात आणले. तेथून पुन्हा नव्या रुग्णालयात हलविण्याच्या अगोदरच शंकुतला देवी यांचा मृत्यू झाला.