|Saturday, May 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » किल्ला होडी वाहतूक ‘बंद’ स्थगित

किल्ला होडी वाहतूक ‘बंद’ स्थगित 

 

प्रतिनिधी/ मालवण

  सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने बंदर विभागाला प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले होते. परंतु महिना उलटून गेला, तरी बंदर विभागाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने 30 डिसेंबर ते 1 जानेवारी असे तीन दिवस किल्ले सिंधुदुर्गवरील प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद आंदोलन शनिवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू करण्यात आले. बंदर विभागाकडून मंत्रालय पातळीवर प्रलंबित मागण्यांसदर्भात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर तीन तासांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

 आंदोलनामुळे मोठय़ा प्रमाणात किल्ले सिंधुदुर्गच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची बंदर जेटीवर गर्दी झाली होती. आंदोलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. भाजप व शिवसेना पदाधिकाऱयांनी आंदोलन मागे घेण्यासाठी यशस्वी शिष्टाई केली.

  किल्ला होडी प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी बंदर जेटी येथे एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी मंत्रालय पातळीवर बैठक लावण्याचे मान्य केले आहे. तसेच स्थानिक भाजप व शिवसेना पदाधिकारी हेही सोबत असल्याने महिनाभरात प्रलंबित समस्या न सुटल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा स्पष्ट केले. यावेळी स्वप्नील आचरेकर, आप्पा मोरजकर, बाळा तारी, दादा आचरेकर, दिलीप आचरेकर, राजू पराडकर, काशिराम जोशी, बाळा तारी, प्रसाद सरकारे, अनंत सरकारे, बाळकृष्ण जोशी, अंतोन डिसोजा, सचिन लोके, काका जोशी, संजय नार्वेकर, जॉनी फर्नांडिस आदी उपस्थित होते.

बंदर विभागात चर्चा

 सकाळी बंदर विभागाकडून संघटनेला चर्चेला निमंत्रित करण्यात आले होते. पदाधिकारी तसेच भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर हे संघटनेच्यावतीने चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी मंगेश सावंत म्हणाले, बंदरजेटी येथील गाळ अनेक वर्षे काढलेला नाही. मंजूर जेटीच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी. पद्मगड ते दांडी सिंधुदुर्ग या मार्गावर देण्यात आलेली परवानगी रद्द करावी. प्रमाणपत्रांची वैधता एक वर्षावरून पाच वर्षे करावी. उतारू परवान्याची वैधता एक वर्षावरून पावसाळी हंगाम वगळता सर्व्हे प्रमाणपत्राच्या आधारे पाच वर्षे करावी. थर्ड पार्टी इन्शुरन्स पाच लाखावरून किमान एक लाखापर्यंत करावा. आयव्ही अंतर्गत प्रवासी संख्या किमान 20 पेक्षा अधिक प्रवासी निर्धारित करावी, यासह अन्य मागण्यांसाठी ही लढाई असल्याचे स्पष्ट केले.

राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांशी चर्चा

 भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा केली. चव्हाण यांनी संघटनेच्या समस्यांसदर्भात मुंबईत जानेवारी महिन्याच्या दुसऱया आठवडय़ात बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच बंदरातील गाळ काढण्यासंदर्भातही तातडीने तोडगा काढण्याचे स्पष्ट केले. याबाबतची माहिती केनवडेकर यांनी  वाहतूक संघटनेच्या सर्व सभासदांना दिली. बंदर विभागाचे वरिष्ठ अधिकारी संघटनेशी चर्चा करण्यासाठी न आल्याने संघटना सभासदांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. संघटनेला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक दीपक पाटकर हेही उपस्थित होते.

 

Related posts: