|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सर्पमित्रांनीच केली 12 लाखांची तस्करी

सर्पमित्रांनीच केली 12 लाखांची तस्करी 

प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ातील तीन सर्पमित्रांनी दोन मांडुळ जातीचे साप व नागाचे 1 मिली विष तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांना पकडले. त्यांच्याकडून दोन मांडुळ जातीचे साप व नागाचे विष असा 11 लाख 81 हजाराचा मुद्येमाल जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत 50 लाख ते 1 करोड रूपये असल्याचे समजते.
गुन्हे अन्वेषण विभागाला गोपनीय माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती की, साताऱयात तीन सर्पमित्र विनोद विजय राऊत (वय 26) रा. कवडेवाडी ता. कोरेगाव जि. सातारा, सागर रविंद्र साठे (वय 26) रा. भावरापूर ता. हवेली जि. पुणे हे देघे मांडुळ जातीच्या सापाची तस्करी करणार होते, तर रोहित अर्जून कायंगुडे (वय 21) रा. सुलतानपूर ता. वाई जि. सातारा हा नागाचे एक मिली विष विकण्यासाठी साताऱयातील मोळाचा ओढा येथे येणार असल्याचे समजले. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा लावून या तिघांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून दोन जिवंत मांडूळ व 1 मिली विष असा 11 लाख 81 हजारांचा मुद्येमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार व पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली शशिकांत मुसळे, सागर गवसणे, पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मोहन नाचण, रविंद्र वाघमारे, योगेश पोळ, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, प्रविण कडव, राहूल कणसे, मारूती अडागळे, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.

Related posts: