पीएचडी करणारा विद्यार्थी ‘हिजबुल’मध्ये सामील

ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमधील पीएचडी करणारा विद्यार्थी ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ या दहशतवादी संघटनेमध्ये सामील झाल्याची माहिती समोर आली आहे. मन्नान वानी असे या तरूणाचे नाव असून तो 5 जानेवारीला संघटनेत सामील झाल्याची माहिती मिळाली आहे.
कुपवाडा जिलह्यातील बशिर अहमद वानी यांचा मुलगा मन्नान वानी हा अलीगड मुस्लीम विद्यापीठातून पीएचडी करत होता. मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमद हा देखील अभियंता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मन्नानचा हातात ग्रेनेड लाँचर घेतलेला एक फोटो कुपवाडय़ात व्हायरल झाला आहे. व्हॉट्स ऍप व फेसबुकवर हा फोटो अपलोड करण्यात आला असून त्याने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याचे या छायाचित्रांमध्ये म्हटले आहे. मन्नाने ‘हिज्बुल मुजाहिद्दीन’ या संघटनेत प्रवेश केल्याचे सांगितले जाते. याबाबत मन्नानचा भाऊ मुबाशिर अहमदने ‘इंडियन एक्सप्रेस’ला प्रतिक्रिया दिली. ‘मन्नानचा फोटो आम्ही देखील बघितला. मात्र, गेल्या चार दिवसांपासून त्याच्याशी आमचा संपर्क झालेला नाही. 4 जानेवारीपासून तो बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद होता. याप्रकरणी आम्ही पोलिसांकडे मिसिंगची तक्रारही दाखल केली होती’, असे त्याच्या भावाने सांगितले.