|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » परिस्थितीवर मात करत यशाला घातली गवसणी

परिस्थितीवर मात करत यशाला घातली गवसणी 

प्रतिनिधी/ बेळगाव

दहावीत असतानाच वडील गेले. आईने मेहनतीने घराचा व कुटुंबाचा गाडा ओढत त्याला कसेबसे शिकविले. सुदैवाने बेळगावच्या केएलई डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेजमध्ये व्यवस्थापन कोटय़ातून मोफत प्रवेश मिळाला आणि त्याने याच संधीचे सोने करत तब्बल 5 सुवर्णपदके मिळवून आपल्या आईच्या कष्टाचे चीज केले. हा प्रवास आहे रामतीर्थनगर येथील रजत होगारट्टी याचा.

रजत हा दहावीत असतानाच वडील गेले. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्याची आई प्रतिभा यांच्यावर पडली. एका खासगी कंपनीत कंत्राटी पद्धतीवर काम करून प्रतिभा यांनी रजतला शिकविले. रजतला दहावीमध्ये 94.56 तर बारावीला 88.16 टक्के गुण मिळाले होते. या गुणवत्तेच्या जोरावरच त्याला केएलई संस्थेने डॉ. एम. एस. शेषगिरी कॉलेजमध्ये व्यवस्थापन कोटय़ातून मोफत प्रवेश मिळवून दिला.

सध्या भारत हेवी इलेक्ट्रीकल्स कंपनीत कार्यरत

त्याने या संधीचे सोने करत मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयात तब्बल 5 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. सध्या तो बेंगळूर येथील भारत हेवी इलेक्ट्रीकल्स लि. या कंपनीत कार्यरत आहे. दोन-तीन वर्षात आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर त्याला मेकॅनिकल विषयात एमएस करायचे आहे. त्याचा हा प्रवास इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक ठरणारा आहे.

Related posts: