|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तुरमुरी कचरा डेपो सपाटीकरणाचा घाट

तुरमुरी कचरा डेपो सपाटीकरणाचा घाट 

वार्ताहर / उचगाव

तुरमुरी कचरा डेपोलगतच्या खुल्या जागेतील दीड एकर जागेवर बुलडोझर फिरवून सपाटीकरण करण्याचा सपाटा कचरा डेपो संबंधितांनी सुरू केला आहे. या कचरा डेपोच्या विस्तारीकरणाचा घाट चालविल्याचे ग्रा. पं. च्या लक्षात येताच बुधवारी ग्रा. पं. अध्यक्षांसह सदस्यांनी संबंधितांना दम देऊन काम बंद करण्याची सूचना दिली.

तुरमुरी कचरा डेपोच्या दुर्गंधीमय वातावरणामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना कचरा डेपोचे विस्तारीकरण करण्याचा घाट घालून मोठा धक्काच दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुरमुरी कचरा डेपो हलविण्यासाठी सर्व मार्गांनी जनतेने आंदोलन केले. मात्र, शासनाने दंडूकेशाहीचा धाक दाखवून जनतेचा आवाज दाबला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

तुरमुरी कचरा डेपोचे विस्तारीकरण थांबवा व कचरा डेपो त्वरित स्थलांतरित करण्यासाठी गुरुवार दि. 11 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ग्रा. पं. अध्यक्ष नागनाथ जाधव यांनी दिली. कचरा डेपोचे विस्तारीकरण थांबविले नाही तर रास्तारोको आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विस्तारीकरणाच्या नावाखाली जवळपास दीड एकर जागा बुलडोझरच्या साहाय्याने सपाट करण्यात आली आहे. याबाबत तुरमुरी ग्रा. पं. ला सुगावा लागताच ग्रा. पं. अध्यक्ष नागनाथ जाधव, सदस्य रामू खांडेकर, लक्ष्मण जाधव, सचिव सुतार व कर्मचारीवर्ग यांनी सदर जागेची पाहणी करून सपाटीकरणाचे काम थांबवावे, अशी विनंती केली. मात्र, यावेळी कचरा डेपो संबंधितांनी थातूरमातूर उत्तरे देऊन ग्रा. पं. सदस्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.