|Thursday, December 13, 2018
You are here: Home » Top News » भीमा कोरेगावची दंगल भाजप पुरस्कृत ;अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप

भीमा कोरेगावची दंगल भाजप पुरस्कृत ;अरविंद केजरीवाल यांचा खळबळजनक आरोप 

बुलडाणा / प्रतिनिधी :

कोरेगाव भीमा येथील हिंसाचार हा भाजप व संघ पुरस्कृत असल्याचा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी येथे केला. भाजपने शिवाजी महाराज आणि सावित्रीबाईंच्या स्वप्नांचा चुराडा केला असल्याची टीकाही त्यांनी केली.

जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाण्यातील सिंदखेडराजामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सिंदखेडमध्ये जाऊन राजमाता जिजाऊंचे दर्शन घेतले. त्यानंतर घेतलेल्या सभेत केजरीवाल बोलत होते.

केजरीवाल म्हणाले, भाजप हा दंगली घडविणारा पक्ष आहे. मागील इतिहास तपासला, तरी हे लक्षात येईल. कोरेगाव भीमाच्या दंगलीमागेही भाजपा व संघाचा हात आहे. या माध्यमातून लोकांमध्ये भीती पसरविण्याचे या मंडळींचे षड्यंत्र आहे. महाराष्ट्रात सर्वांत वीज महाग का? कारण, हे लोक उद्योगपतींना मिळाले आहेत. शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप काहीही करत नाही. कारण यांना गरीब, दलित, शोषित व शेतकऱयांशी काहीही देणे घेणे नाही. महाराष्ट्रात ज्यांना शाळा चालवता येत नाहीत, ते सरकार काय चालवणार, असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला.

दरम्यान, राजमाता जिजाऊंच्या दर्शनासाठी या ठिकाणी मोठय़ा रांगा लागल्या होत्या. पोलिसांच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. जागोजागी सुरक्षा कठडे, टेहळणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मराठा समाजातील विवाहोत्सुक युवक-युवतींचा राज्यव्यापी मेळावाही आयोजित करण्यात आला होता.

Related posts: