|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » जेट एअरवेजची स्मार्ट लगेजवर बंदी

जेट एअरवेजची स्मार्ट लगेजवर बंदी 

मुंबई

 विमानसेवांची जागतिक संघटना आयएटीएकडून दिशानिर्देश मिळाल्यामुळे जेट एअरवेज या भारतातील सर्वात मोठय़ा खासगी विमान कंपनीने सोमवारपासून स्मार्ट लगेजच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट लगेजप्रमाणेच ज्या उपकरणांमध्ये काढता न येण्यासारख्या बॅटरीज बसविल्या आहेत, अशा उपकरणांच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात येणार आहे. या बंदीची अंमलबजावणी 15 जानेवारीपासून होत आहे. आयएटीएच्या दिशानिर्देशानुसार इंटिग्रेटेड लिथियम बॅटरीज, मोटर्स, पॉवर बँक्स, जीपीएस, जीएसएम, ब्ल्यूटूथ, आरएफआयडी तसेच वायफाय तंत्रज्ञान इत्यादी सर्वांचा समावेश स्मार्ट लगेजमध्ये करण्यात येतो. लिथियम बॅटरी असणाऱया बॅग्ज, त्यातील बॅटरी काढता येत असेल तरच स्वीकारल्या जाणार आहेत.

तथापि, मोबाईल हँडसेटला मात्र स्मार्ट लगेजच्या सूचीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे विमानप्रवासी आपला मोबाईल हँडसेट प्रवासात स्वतःजवळ बाळगू शकतील.  वरील बंदी जगातील कुठल्याही ठिकाणच्या प्रवासासाठी लागू राहणार आहे, असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

सुरक्षेचे कारण

आयएटीएचा निर्णय विमान प्रवाशांसाठी गैरसोयीचा असला तरी प्रवासातील सुरक्षेकरिता अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन कंपनीने केले आहे. स्मार्ट लगेजमधून छोटय़ा बॉम्बचीही वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दहशतवाद्यांकडून स्मार्ट लगेजचा वापर फियादीन हल्ल्यासाठी होऊ शकतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. स्मार्ट लगेज जवळ न बाळगण्याची तसेच त्यातील बॅटरी काढून ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांवर सोपविण्यात आली आहे. कंपनीचे कर्मचारी केवळ प्रवाशांना नव्या नियमांची माहिती देण्याचे काम करतील. पुढील सर्व जबाबदारी प्रवाशांचीच असेल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.