|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » इन्फोसिसच्या तिमाही नफ्यात वाढ

इन्फोसिसच्या तिमाही नफ्यात वाढ 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

इन्फोसिस या आघाडीवरील माहिती-तंत्रज्ञान कंपनीच्या डिसेंबर 2017 मध्ये संपलेल्या तिमाहीच्या नफ्यात 38.3 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने 5129 कोटी रुपयांचा नफा कमविला असून उत्पन्न 17794 कोटी रुपयांचे झाले आहे. गेल्या वषीच्या याच तिमाहीत कंपनीने 3708 कोटी रुपयांचा नफा कमविला होता. उत्पन्नातील वाढ 7 टक्के झाली असली तरी नफ्यातील वाढ अधिक झाल्यामुळे कंपनीने समाधान व्यक्त केले आहे.

कंपनीचे नवे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी येथे शुक्रवारी ही घोषणा केली. पारेखनी पदभार सांभाळल्यापासूनची ही पहिलीच तिमाही होती. समाधानकारक ताळेबंदामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीवरील कंपनीच्या समभागांच्या किमतीमध्ये समाधानकारक वाढ दिसून आली. यापुढच्या काळात उत्पन्न आणि नफा अधिक वाढविण्याचे कंपनीचे धोरण राहील. नवी ग्राहके मिळविण्यासाठी नव्याने आणि नव्या पद्धतीने प्रयत्न करण्यात येतील. कंपनीतील प्रवर्तक आणि कर्मचाऱयांमधील वाद आता संपुष्टात आले असून कंपनीची भविष्यकाळात उत्तरोत्तर प्रगती होत जाईल, असा विश्वास पारेख यांनी व्यक्त केला.

चालू आठवडय़ाच्या सुरुवातीला कंपनीने अमेरिकेच्या राजस्व विभागाबरोबर ऍडव्हान्स प्रायसिंग करार केला आहे. यामुळे कंपनीला करामध्ये 22.5 कोटी डॉलर्सची बचत होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या सकल पायाभूत उत्पन्नावर होणार असून प्रतिसमभाग उत्पन्न वाढणार आहे, अशी माहिती कंपनीच्या वक्तव्यामध्ये देण्यात आली आहे.