|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ‘शतको’त्सव…

‘शतको’त्सव… 

‘इस्त्रो’चा शंभरावा उपग्रह अंतराळात, सर्व 31 उपग्रह अवकाशात स्थानापन्न, ‘पीएसएलव्ही सी-40’चे 42 वे उड्डाण

श्रीहरीकोटा / वृत्तसंस्था

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने शुक्रवारी श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून शंभरावा उपग्रह अंतराळात यशस्वीपणे सोडून लाखमोलाच्या कामगिरीला गवसणी घातली. शुक्रवारी सकाळी 9.29 वा पीएसएलव्ही-सी 40/कार्टोसॅट 2 मोहिमेचे प्रक्षेपण झाले. पीएसएलव्ही सी-40 सोबत इस्त्रोने तब्बल 31 उपग्रह अवकाशात सोडले. यामध्ये 3 भारताचे तर 28 उपग्रह हे अन्य सहा देशांचे आहेत. यामध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्त्रोने शुक्रवारी नवा इतिहास रचला. ‘इस्त्रो’चे पीएसएलव्ही सी-40 हे प्रक्षेपक 31 उपग्रहांसह अंतराळात झेपावले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. भारतासाठी आजची मोहीम ऐतिहासिक होती. कारण गेल्या वषी इस्त्रोची पीएसएलव्ही सी-39 ही मोहीम अपयशी ठरली होती. त्यानंतर इस्त्रोने पुन्हा जोमाने तयारी करून, पीएसएलव्ही सी-40 हा प्रक्षेपक हवेत झेपावण्यास सज्ज केले होते. यापूर्वी भारताने तब्बल 104 उपग्रह एकाचवेळी सोडून विश्वविक्रम केला होता. ‘पीएसएलव्ही सी-40’ या प्रक्षेपकाचे 42 वे उड्डाण होते. या मोहिमेच्या माध्यमातून शंभरावा उपग्रह अवकाशात जाणार असल्याने या मोहिमेला विशेष महत्त्व होते. इस्त्रोच्या या बहुप्रतिक्षीत मोहिमेकडे भारतीयांसह जगभरातील अवकाश संशोधकांचे लक्ष लागलेले होते.

2018 मधील ही पहिली मोहीम यशस्वी झाल्याने इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. इस्त्रोने 1999 पासून व्यावसायिक शाखेच्या मदतीने परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याचा कार्यक्रम सुरू केला होता. 2016 मध्ये इस्त्रोने इतर देशांचे 22 उपग्रह प्रक्षेपित केले होते. मार्च 2017 मध्ये इस्त्रोने एकाचवेळी 7 देशांचे 104 उपग्रह अवकाशात सोडत रशियाचा विक्रम मोडीत काढला होता. याआधी रशियाने एकाचवेळी 37 उपग्रह अवकाशात सोडण्याची किमया साधली होती. रशियाचा हाच विक्रम इस्त्रोने मोडला होता. आता पुन्हा एकाचवेळी 31 उपग्रह अवकाशात पाठवून आणखी एक लाखमोलाची कामगिरी केली आहे.

शास्त्रज्ञांचा आनंद द्विगुणीत

शुक्रवारी सकाळी 9 वाजून 29 मिनिटांनी ‘पीएसएलव्ही सी-40’ हे प्रक्षेपक 31 उपग्रहांसह अवकाशात झेपावल्यानंतर काही मिनिटांमध्येच उपग्रहांनी निर्धारित कक्षेत प्रवेश केला. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. या मोहीमेची इस्रोच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद झाली. इस्त्रोची 2018 मधील ही पहिलीच मोहीम होती.

‘कार्टोसॅट-2’ विषयी….

अवकाशात पाठविण्यात आलेल्या 31 उपग्रहांमध्ये यात भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. तसेच भारताच्या ‘कार्टोसॅट-2’ या उपग्रहाचाही समावेश आहे. अंतराळातील भारताचा डोळा म्हणून या उपग्रहाकडे पाहिले जाते. पृथ्वीवरच्या घडामोडींकडे लक्ष ठेवण्याचे काम हा उपग्रह करतो. आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहात आहे. भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं काम करणार आहे. हा उपग्रह पृथ्वीची अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्रे पाठवणार आहे.

विदेशी उपग्रहांविषयी…

अमेरिकेचे सर्वाधिक 19 तर दक्षिण कोरियाचे 5 उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. तर फिनलँड, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स या देशांच्या प्रत्येकी एका उपग्रहाचा यात समावेश आहे. इस्त्रो आणि ऍन्ट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार विदेशी उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. या विदेशी उपग्रहांमध्ये तीन मायक्रो आणि 25 नॅनो उपग्रहांचा समावेश आहे.

Related posts: