|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जैन बांधवांचा बंद, निषेध मोर्चा

जैन बांधवांचा बंद, निषेध मोर्चा 

वार्ताहर/   सदलगा

 नुकत्याच एका कन्नड खासगी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भगवान गोमटेश मूर्तीला कपडे परिधान करावेत, असे विधान करत सदर वृत्त प्रसिद्ध केले. त्याच्या निषेधार्थ सदलगा, कागवाड बंदचे आवाहन करण्यात आले होते. सदर बंदला शहरवासियांनी प्रतिसाद देत सर्व व्यवहार बंद ठेवले. यावेळी निषेध मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

 दोन दिवसापूर्वी पत्रकार प्रभू आदी यांनी भगवान गोमटेश यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने जैन समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. सदर घटनेचा निषेध म्हणून त्या पत्रकाराला त्वरित अटक करण्यात यावी. तसेच त्यांना शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रारंभी सकाळी येथील बस्ती परिसरात जैन बांधवांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन निषेधाच्या घोषणा देत मोर्चा काढला. त्यानंतर जैन श्रावक मंडळ, वीर सेवा दल व जैन बांधवांच्या नेतृत्वाखाली काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला आला. उपतहसीलदार कार्यालयाजवळ येताच मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी उपतहसीदार सिलवंत यांना  निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रकाश पाटील म्हणाले, जैन समाज शांतता प्रिय समाज आहे. कोणतीही हिंसात्मक घटना न घडविता शांततेत बंदचा नारा दिल्याचे त्यांनी सांगितले.  रणजीत पाटील म्हणाले, पत्रकाराने आपल्या लेखनीच्या माध्यमातून समाजातील शांततेचा भंग करण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी पापा पाटील, बाळासाहेब पाटील, डॉ. आर. जे. पाटील, सचिन बिंदगे, आनंद उगारे, भरत बदनीकाई, भरत पाटील, पंकज तिप्पणावर, राजू काळे, चंद्रकांत हुक्केरी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

संबंधित पत्रकारावर कारवाई करा

कागवाड : बी टीव्ही कन्नड वृत्तवाहिनीवर भगवान गोमटेश यांच्याविषयी अश्लिल वक्तव्य करणारे वृत्त प्रसिद्ध करणाऱया पत्रकारावर कठोर कारवाई करण्यात यावी. सदर वृत्तामुळे समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. या घटनेची दखल घेत संबंधित पत्रकारावर कारवाई करण्यात यावी, या आशयाचे निवेदन परिसरातील जैन बांधवांतर्फे शुक्रवारी उपतहसीलदारांचे प्रतिनिधी ए. दासर यांना देण्यात आले.

निवेदनात, सदर पत्रकाराने भगवान गोमटेश्वर यांना पोशाख परिधान करण्यात यावा, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे जैन बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. समाजातील शांतता भंग करण्याचे कार्य संबंधित पत्रकाराने केले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सदर निवेदन उपतहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठविण्यात येणार आहे.

निवेदन देताना दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ऍड. टी. के. धोतरे, सुभाष कठारे, सुरेश पेरुजैन, आदीनाथ बिंदगे, कल्लाप्पा मगदूम, जयपाल करव, शांतीनाथ माणगावे, प्रकाश चौगुले, संतोष मालगावे, लगमन्ना जारे यांच्यासह वीर सेवादल, वीर महिला मंडळ, दिगंबर जैन समितीचे सदस्य यांच्यासह समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: