|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » क्रीडा क्षेत्रात करिअरची उत्तम संधीः झुंझारराव पाटील

क्रीडा क्षेत्रात करिअरची उत्तम संधीः झुंझारराव पाटील 

वार्ताहर/ आष्टा

आपल्याकडे खेळाला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. खेळ म्हणजे अभ्यासातून वेळ काढून मनावरचा ताण दुर करण्याचे साधन समजले जाते. पण तरीही क्रीडा क्षेत्र काही करिअर होवू शकत नाही, म्हणून अनेक पालक मुलांना लहानपणापासूनच खेळापासून दूर ठेवतात. पण आता ही मानसिकता बदलायला हवी. क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या उत्तम संधी आहेत, किंबहुना याकडे आता करिअर म्हणून पहायला हवे, असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी केले.

आष्टा येथील शिवाजीराव पाटील(आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱया अभयसिंह सुनील माने या कुस्तीपट्टुच्या सत्कार समारंभात झुंझारराव पाटील बोलत होते. यावेळी प्रगतीशील शेतकरी सुनील माने, पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे, उपाध्यक्ष केशव माळी, सचिव सुनील पाटील, संचालक राजू पाटील, दिपक शिंदे, प्रदीप ढोले, शामराव पवार, जैद देवळे,संदीप हालुंडे, प्रशांत महाजन, राजू ढोले-पाटील, अमित पाटील, अविनाश विरभद्रे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. प्रारंभी झुंझारराव पाटील यांच्याहस्ते अभयसिंह माने याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना झुंझारराव पाटील पुढे म्हणाले, आज कार्पोरेट जगतानंतर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी नोकरी क्रीडा क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे खेळाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. खेळाकडे पाहण्याचा दृष्ट्रीकोन शासनानेही बदलला आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने क्रीडा धोरण तयार केले आहे. तरुणांना खेळाकडे आकर्षित करण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.  आज भारतीय खेळाडूंना मानधनापोटी कोटय़ावधी रुपये मिळत आहेत. मारुन मुटकून कोणाला खेळाडू बनविता येत नाही,त्यासाठी स्वतःला खेळाचे आकर्षण असणे आवश्यक असते. खेळाच्या आकर्षणातूनच खेळाडूमध्ये जिद्द निर्माण होत असते, पालकांनी खेळासाठी विद्यार्थ्यांच्या पाठीशी रहायला हवे.अभयसिंह माने याने राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमाकं पटकावून आष्टेकऱयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

यावेळी बोलताना दिपक शिंदे म्हणाले, कुस्ती या क्रीडा प्रकारास महाराष्ट्रानेच मोठे महत्व दिले आहे. तसा हा पारंपारिक खेळ आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात तरुणवर्ग कुस्ती खेळण्यासाठी आखाडयात उतरत आहे. मात्र अलिकडे भारतीय खेळाबद्दल एक कमालीची उदासिनता जाणवत आहे. भारतीय खेळांस लौकिक प्राप्त होण्यासाठी देशातल्या जनतेने पाठिंबा देण्याची गरज आहे. सुनील माने सारखे पालक घडणे ही आजची देशाची गरज बनली आहे. सुनील माने यांचा आदर्श घेणे आवश्यक आहे.

स्वागत संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब हालुंडे यांनी केले. आभार सचिव सुनील पाटील यांनी मानले.

Related posts: