|Friday, February 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट संघबदलाचा शौकिन, अनेक खेळाडू सातत्याने आत-बाहेर

विराट संघबदलाचा शौकिन, अनेक खेळाडू सातत्याने आत-बाहेर 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकापराभव स्वीकारावा लागल्यानंतर पत्रकार परिषदेतील एका प्रश्नावर विराट कोहली भडकला असला तरी आकडेवारी पाहता, विराटच्या नेतृत्वाखाली खेळवल्या गेलेल्या 34 कसोटी सामन्यात विविध कारणांमुळे सातत्याने बदल केले गेले आहेत आणि त्या बदलांचा भारताला फटकाच अधिक बसला असल्याचे प्रथमदर्शनी चित्र असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

संघबदलात विशेष स्वारस्य असलेल्या विराटने 7 कसोटी सामन्यात कमीत कमी 1, 16 कसोटी सामन्यात कमीत कमी 2, 6 कसोटीत किमान 3, 4 कसोटीत कान 4 बदल केले आहेत तर एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऍडलेड कसोटीत नेतृत्व पदार्पण करताना चक्क संघात 5 बदल केले होते, ते लक्षवेधी आहे. याचमुळे भारताला नियमित सलामी जोडी देखील निश्चित करता आलेली नाही. मुरली विजय, केएल राहुल, शिखर धवन कधी दुखापतीमुळे बाहेर फेकले गेले तर कधी खराब फॉर्मचा त्यांना फटका बसत राहिला. विराट कर्णधार असताना विजयने 25, राहुलने 20 व धवनने 17 सामने खेळले. या कालावधीत भारताने सलामीसाठी विजय, धवन व केएल राहुलसह गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, पार्थिव पटेल व अभिनव मुकूंद असे पर्यायही आजमावले.

विराटने नव्या खेळाडूंना फारशी संधी दिल्याचे या कालावधीत दिसून आले नाही. तो कर्णधार असताना कर्ण शर्मा, नमन ओझा, जयंत यादव, करुण नायर, हार्दिक पंडय़ा, जसप्रीत बुमराह या 6 खेळाडूंनाच पदार्पणाची संधी मिळाली. धोनी कर्णधार असताना अश्विनचे स्थान आत-बाहेर अशा स्वरुपाचे राहिले. पण, कोहलीने अश्विनवरच सर्वाधिक भरवसा दाखवला. विराट कर्णधार असतानाच अश्विनने 34 पैकी 33 सामने खेळले. अश्विनने या दरम्यान 193 बळी घेतले व 1159 धावा जमवल्या.

आता रहाणेला संधी न दिल्याबद्दल विराटवर टीका होत असली तरी रहाणेने विराट कर्णधार असताना 34 पैकी 30 कसोटी सामने खेळले व पाचव्या स्थानीच फलंदाजी केली. या क्रमांकावर 37 डाव खेळत त्याने 39.75 सरासरीसह 1312 धावा केल्या. अर्थात, भुवनेश्वर मात्र अश्विनप्रमाणे सुदैवी ठरला नाही. भुवनेश्वरच्या वाटय़ाला 34 पैकी केवळ 8 वेळा स्थान लाभले. 2016 मध्ये विंडीजविरुद्ध एकदाच सलग चार वेळा त्याला संधी मिळाली. टीकेचे लक्ष्य ठरत आलेल्या रोहित शर्माने या कालावधीत चारवेळा पुनरागमन केले.

पुजारा व साहा यांनी प्रत्येकी 29 सामने खेळले. पुजारा तिसऱया स्थानी उतरत 54.87 च्या सरासरीने 2187 धावा जमवू शकला. राहुल व धवन यांना मात्र या कालावधीत प्रत्येकी 6 वेळा, विजय, उमेश यादव, इशांत प्रत्येकी 5 वेळा व रवींद्र जडेजाला 4 वेळा अंतिम संघातून डच्चू देण्यात आला. आता दि. 24 पासून खेळवल्या जाणाऱया तिसऱया व शेवटच्या कसोटीतही विराट ही बदलाची परंपरा निश्चितपणाने कायम राखेल, असे मानले जाते.

Related posts: