|Sunday, August 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » अनेकांचे आयूष्य 16 एम.एम.च्या जादूई रीळांनी घडले

अनेकांचे आयूष्य 16 एम.एम.च्या जादूई रीळांनी घडले 

पुणे / प्रतिनिधी

   काळ कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो, हे सत्य आहे. चित्रपट क्षेत्रात तंत्र बदलले तशा अनेक गोष्टी बदलल्या. त्यामुळे बदलत्या काळात नवनवीन कल्पना देखील प्रत्येकाला सुचल्या पाहिजेत. सध्याच्या पिढीला आज आपण जो चित्रपट पाहतोय त्यामागील इतिहास समजणे आवश्यक आहे. मात्र, पूर्वीच्या काळातील तंत्राचेही महत्त्व तितकेचे असून तेव्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे. जर 16 एम.एम. चित्रपट नसते तर आज आम्ही दिग्दर्शक झालो नसतो. अनेक लोकांचे आयुष्य या जादुई रिळांनी घडले आहे, असे मत सिनेनिर्माता गजेंद्र अहिरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

    आम्ही पुणेकर संस्थेतर्फे 16 एम. एम. दोन दिवसीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या ऑडिटोरियमध्ये करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी आमदार मेधा कुलकर्णी, माजी आमदार उल्हास पवार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, किरण धिवार, हेमंत जाधव, डॉ. राजेंद्र खेडेकर, अ‍ॅ[. मिलिंद पवार, गोरक्ष धोत्रे, शशिकांत डोईफोडे, अरविंद जडे, अखिल झांजले, दिनेश देशपांडे उपस्थित होते. उद्घाटनापूर्वी रिळांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. 16 एम.एम.चे ज्ये÷ वितरक सुरेश एकबोटे, यशवंत पारशेट्टी, अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, संजीव भंडार, आप्पासाहेब लोणकर यांचा सन्मान करण्यात आला. तर, ऑस्कर अवॉर्ड परिक्षण समितीचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.

    अहिरे म्हणाले, सध्या आपल्याकडे मोबाईलवर चित्रपट बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. परंतु चित्रपट भारतात येण्यासाठी पूर्वीच्या पिढीने काय केले आहे, ही गोष्ट दाखविणे स्वागतार्ह आहे. अशा चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना त्या काळातील चित्रपट कसे निर्माण केले असतील, हे समजेल.

    कुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी ग्रामीण भागात 16 एम.एम. चित्रपट दाखविले जात होते. त्याने सामाजिक प्रबोधन करण्याचे काम केले. समाज एकत्र करण्याचे काम या चित्रपटांनी केले आहे. तंत्रज्ञान आता बदलत असून याचा उपयोग पूर्वासारखाच समाजप्रबोधनाकरीता व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले. उल्हास पवार म्हणाले, गणेशोत्सव, शिवजयंती या काळात चित्रपट दाखविले जात होते. यामध्ये प्रगती होत असताना आता घरी बसून देखील आपण चित्रपट पाहू शकतो. परंतु याचा इतिहास सगळय़ांपर्यंत पोहोचायला हवा.

   हेमंत जाधव म्हणाले, भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ पुण्यात रोवली गेली, याचा पुणेकरांना अभिमान आहे. चित्रपट उद्योगाने मूक पट, बोलपट, कृष्णधवल ते रंगीत स्टिरिओ ते डॉल्बी साऊंड, इंस्तामान कलर ते फोर के असे अनेक बदल अनुभविले आहेत. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे 16 एम.एम.चित्रपट. चित्रपट सृष्टीतील हाच सुवर्णकाळ रसिकांपर्यंत पोहोचविण्याकरीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.