|Friday, January 18, 2019
You are here: Home » Top News » शासकीय गोदामातील धान्यांमध्ये 100 कोटींचा घोटाळा : एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

शासकीय गोदामातील धान्यांमध्ये 100 कोटींचा घोटाळा : एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप 

जळगाव/ प्रतिनिधी :

भुसावळ येथील शासकीय धान्याच्या गोदामात 100 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी येथे केला. दरम्यान, भुसावळ येथील शासकीय गोदामात प्रत्यक्ष पाहणी करण्याबरोबरच खडसे यांनी थेट मंत्रालयातील सचिवांची फोनवर झाडाझडती घेत या मुद्दय़ावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या संपूर्ण प्रकाराने पुरवठा विभाग हादरला आहे.

भुसावळ येथे शासकीय धान्य गोदामात मोठय़ा प्रमाणावर धान्याचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला जात होता. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नव्हते. शुक्रवारी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अचानक भुसावळ येथील धान्याच्या गोदामास भेट दिली. राज्य शासनाच्या गोदामात येणारी धान्याची पोती ही मशिनने शिवून बंद केलेली असतात. येथे, मात्र काही भाग हा हाताने शिवलेला आढळला. तसेच पोत्यांचे वजन केले असता पन्नास किलोच्या पोत्यात पाच ते सहा किलो धान्य कमी आढळले. याचा अर्थ धान्य काढून नंतर ते पोते हाताने शिवले गेले होते. याप्रकरणी संबंधितांची झाडाझडती घेतली असता कुणीही अधिकारी उत्तर देऊ शकला नाही. यानंतर खडसेंनी थेट मंत्रालयात फोन लावून सचिव स्तरावर झाडाझडती घेण्यास सुरूवात करतातच मंत्रालय हादरले. हा 100 कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.

खडसे यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत शनिवारी मुंबईहून एक सचिवस्तरीय पथक भुसावळात दाखल झाले असून, त्यांनी कागदपत्रांची पाहणी करण्यास सुरवात केली. हे कमी की काय आणखी एक पथक रविवारी दाखल झाले. ही पथके तीन दिवस तपासणी करून आपला अहवाल पुरवठामंत्री गिरीश बापट यांना देतील. रेशन धान्याचा हा घोटाळा संपूर्ण जळगाव जिह्यात सुरू आहे. यापूर्वी हा प्रश्न उपस्थित केला गेला होता, मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने यावर मौन धारण केले असून, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही. या घोटाळयातील दोषी अधिकाऱयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नाथ फाऊंडेशनने केली.

Related posts: