|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळणे भाग्याचे!

आजी-आजोबांचे मार्गदर्शन मिळणे भाग्याचे! 

सदानंद पवार यांचे मतः उमा मिलिंद पवार हायस्कूलमध्ये अनोखा उपक्रम

वार्ताहर / देवगड:

आज समाजात वृद्धांना मानाची वागणूक मिळत नाही. मात्र, हे वृद्ध आपले खरे मार्गदर्शक आहेत. जीवनातील कटूगोड प्रसंगामधील त्यांचे अनुभव आपल्याला जीवनाची नवी उमेद निर्माण करून देऊ शकतात. आजीआजोबांचे विचार व त्यांचे संस्कार आपल्याला नवी प्रेरणा निर्माण करून देतात. आजीआजोबांचे मार्गदर्शन मिळणे ही आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे, असे मत शिक्षणप्रेमी सदानंद पवार यांनी येथे व्यक्त केले.

आजीआजोबा आपले मार्गदर्शक आहेत’, ही शिकवण मुलांना मिळावी, या हेतूने येथील उमा मिलिंद पवार हायस्कूलमध्ये (देवगड इंग्लिश मीडियम स्कूल) आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर संस्था संचालक सुनील कुळकर्णी, डॉ. सुनील आठवले, निशिकांत साटम, आनंद कुळकर्णी, कांतिभाई पटेल, मनिष भद्रा, शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता मोर्ये आदी उपस्थित होते.

यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. यात उपस्थित आजीआजोबांनी ‘हम भी कुछ कम नही’ असे दाखवत विविध खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग दर्शवत आपल्या ‘तारुण्याची’ झलक दाखवून दिली. विविध खेळात विजेत्या आजीआजोबांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम व्यवस्थापनाची जबाबदारी सई चव्हाण व अश्विनी लांबोरे यांनी सांभाळली. सूत्रसंचालन तृप्ती प्रभू यांनी केले. आभार शिल्पा कदम यांनी मानले.

Related posts: