|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तासगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

तासगावच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या 

प्रतिनिधी  / तासगाव

तासगावातील शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन येथे दुसऱया वर्षात शिक्षण घेणाऱया 17 वर्षीय विद्यार्थिनीने वसतिगृहात (होस्टेल) रूममध्ये पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने तंत्रनिकेतन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.

विद्यार्थिनी वाळवा तालुक्यातील

वाळवा तालुक्यातील साखराळे येथील प्रणाली प्रकाश पाटील वय 17 वर्षे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. प्रणाली ही शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात डेस डिसायनर कोर्सच्या दुसऱया वर्षात शिक्षण घेत होती.

चार मैत्रिणींसह राहत होती

याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, या शासकीय तंत्रनिकेतन आवारात विविध नावानी स्वतंत्र वसतिगृहे आहेत. यापैकीच कोयना हे एक वसतिगृह आहे. याच वसतिगृहाच्या एका रूममध्ये प्रणाली आपल्या इतर चार मैत्रिणीसोबत राहात होती.

पंख्याला ओढणीने गळफास

शनिवारी यापैकी तीन मैत्रिणी शैक्षणिक कामकाजानिमित्त व घरी बाहेर गावी गेल्या होत्या. प्रणाली ही एकटीच रूम होती. दरम्यान, रात्री काही मैत्रिणींनी प्रणालीला आम्ही सोबत झोपायला येऊ का असे विचारले. पण प्रणाली नको म्हणाली. मध्यरात्रीच्या दरम्यान प्रणालीने आपल्या रूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरवाज उघडला नाही

या तीन विद्यार्थिनी सकाळी 9 च्या दरम्यान रूममध्ये जाण्यासाठी प्रणालीच्या रूमचा दरवाजा वाजवू लागल्या. मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी अनय विद्यार्थिनींना हा प्रकार सांगितला. त्यानुसार प्रणालीच्या मोबाईलवर फोनही केले पण फोन ही उचलत नाही म्हटल्यानंतर काही विद्यार्थिनींनी बाजूच्या खिडकीतून आत पाहिले.

वाचवण्यासाठी धडपड

यावेळी प्रणालीने पंख्याला गळफास लावून घेतलेल्या निदर्शनास आले. दरम्यान तेथील वॉचमन, शिक्षिका व विद्यार्थिंनींनी तिला वाचवण्याच्या दृष्टीने दरवाजाच्या कडीच्या ठिकाणी सळईने एक होल पाडले. तेथून हात आत घालून रूमची कडी काढली. मात्र प्रणाली मृत झाल्याच आढळले.

पोलीस स्टेशनचा फोन एन्गेज

ही घटना लक्षात येताच शिक्षिका व विद्यार्थिंनीनी तात्काळ तासगाव पोलीस स्टेशनला फोन केला. मात्र तब्बल एक तास पोलीस स्टेशनचा फोन एन्गेज होता. दरम्यान, त्यांनी तासगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांच्यासह हवालदार कुंभार व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून प्रणालीचा मृतदेह खाली उतरवला.

चिठ्ठी सापडली प्रणालीने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. यामध्ये माझ्या कुटुंबातील मम्मी पप्पांसह सर्वांना तसेच मित्र मैत्रिणींना नमस्कार. मी स्वतःहून हे आत्महत्येचे पाऊल उचलले असून यासाठी कोणासही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे.  ही चिठ्ठी तेथेच एका वहीमध्ये मिळून आली असल्याचे उपनिरीक्षक प्रियांका सराटे यांनी सांगितले.

…तर घटना घडली नसती

कोणत्याही निवासी महाविद्यालयातील वसतिगृहामध्ये रूममध्ये एका विद्यार्थिनीस झोपण्याची परवानगी नसावी असे समजते. या शासकिय तंत्रनिकेतनमध्ये विविध वसतिगृह असून येथे अनेक विद्यार्थिनी आहेत. शनिवारी रात्री प्रणाली ही एकटीच रूममध्ये आहे, हे येथील शिक्षिकांना व विद्यार्थिंनीना ही माहित होते. असे असताना तिच्या सोबत एक अथवा दोन विद्यार्थिनी झोपण्यासाठी पाठवल्या असत्या तर ही घटना घडली नसती. याबाबत वसतिगृह अधीक्षक एस. यू. शिंदे यांना विचारणा केली असता त्यांनी ती नेहमी एकटी राहत असे. त्यामुळे आता ही एकटी झोपेल असे समजलो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

महिला तंत्रनिकेतन चर्चेत

तासगावातील हे तंत्रनिकेतन येथील विद्यार्थिनीच्या कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे चांगलेच चर्चेत आहे. नको त्या गोष्टी येथील विद्यार्थिनींकडून यापूर्वी घडल्या आहेत. काही पालकांनाही यांचा फटका बसला आहे. निवासी विद्यार्थिनीच्या तुलनेत योग्य ती दक्षता घेण्यासाठी अपेक्षित अशी प्रशासकीय यंत्रणा नसल्याचे बोलले जात आहे.

पत्रकारांना तासभर रोखले

आत्महत्या केल्याचे समजताच पत्रकार सकाळी सव्वाअकराच्या सुमारास येथे पोहोचले. दरम्यान, तेथील वॉचमननी वसतिगृह अधीक्षक एस. यू. शिंदे यांना फोन करून विचारले असता, थांबण्यास सांगा असे त्यांनी सांगितले. पुन्हा फोन केल्यानंतर महिला वसतिगृह आहे, पुरूषांना कसा प्रवेश द्यायचा असा सवाल करून पुन्हा थांबण्यास सांगितले. दरम्यान, दोन नगरसेवक आले आहेत असे सांगितले तेव्हा नगरसेवकासह पत्रकारांना आतमध्ये पाठवा असे सांगितले. पत्रकारांनी तशी नोंद करून सव्वाबाराच्या सुमारास वाजता प्रवेश दिला. वृत्तसंकलनाचे काम सुमारे 30 मिनिटात आवरले व तेथून परतून एकच्या सुमारास बाहेर येत असल्याची नोंदही रजिस्टरला केली. वृत्त संकलनासाठी पत्रकारांना तब्बल एक तास रोखण्यात आले होते. याबाबत विचारणा केली असता प्रशासनाकडून पोलिसांनीच आम्हाला सांगितले होते असे स्पष्टीकरण दिले, मात्र पोलिसांनी आम्ही असे काही सांगितले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांच्या समोरच दिले.

Related posts: