|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » तुये येथील बेकायदा डोंगरकापणीवर कारवाई

तुये येथील बेकायदा डोंगरकापणीवर कारवाई 

प्रतिनिधी/ पेडणे

तुये पंचायत क्षेत्रातील बेकायदा डोंगर कापणीप्रकरणी 25 रोजी पर्यंत कामबंदचे आदेश असतानाही शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवसात याठिकाणी मोठय़ा प्रमाणात डोंगर कापणी सुरु होती. सदर काम जीवनदायीनी संघटनेने पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या लेखी निवेदन निदर्शनास आणून दिली. पेडणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबी व जेसीबी चालक राजा अँथोनी (करासवाडा – बार्देश) याला रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले. 

यासंबंधि माहितीनुसार, तुये पंचायत क्षेत्रात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या बेकायदा डोंगर कापणी विरोधात गेल्या आठवडय़ात पेडणे मामलेदार, नगरनियोजन आणि पोलिसांनी कारवाई करुन जीसीबी ताब्यात घेतले होते. त्यासंबंधी तक्रार नोंदवून घेऊन 25 रोजी पेडणे उपजिल्हाधिकारी न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र या आदेशाला न जुमानता शनिवार दि. 20 व रविवार दि. 21 रोजी दोन जेसीबी यंत्राद्वारे डोंगर कापणी सुरु होती.

जीवनदायिनी संघटनेने पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांची भेट घेऊन या डोंगर कापणीसंबंधी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर पेडणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेसीबी जीए 03 आर 1265 व जीए 03 आर 7086 अशी दोन जेसीबी जप्त केली व चालक राजा अँथोनी याला अटक केली. जीवनदायीनी संघटनेचे दयानंद मांद्रेकर, संजय राऊत, विनोद मेथर व निवृत्ती शिरोडकर या संघटनेच्या सदस्यांनी पेडणे पोलिसांना निवेदन देऊन हे बेकायदेशीररित्या सुरु असलेली डोंगर कापणी बंद केली.