|Sunday, January 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपुष्टात

अमेरिकेतील ‘शटडाउन’ संपुष्टात 

डेमोक्रेट्स-रिपब्लिकन्स खासदारांमध्ये विधेयकावर सहमती : अमेरिकेतील सर्व सेवा पुन्हा कार्यान्वित

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

अमेरिकेत 3 दिवसांपर्यंत चाललेले शटडाउन (कामबंद) मंगळवारी संपुष्टात आले. रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट्स यांच्यात झालेल्या करारानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शासकीय खर्चासाठी एका अल्पकालीन वित्तसहाय्य विधेयकावर स्वाक्षरी केली. या विधेयकावर स्वाक्षरी झाल्याने मंगळवारपासून सर्व सरकारी सेवा पुन्हा कार्यान्वित झाल्याचे सांगण्यात आले.

20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या संसदेत याच अल्पकालीन खर्च विधेयकावरून सिनेटमध्ये सहमती निर्माण झाली नव्हती. ज्यानंतर ट्रम्प सरकार अधिकृतरित्या शट-डाउनवर गेले होते. यामुळे संघीय कर्मचारी शनिवारपासून विनावेतन काम करत होते.

मोठय़ा फरकाने विधेयक संमत

मंगळवारी रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेट्सच्या बैठकीनंतर सिनेट आणि हाउस दोन्ही ठिकाणी विधेयक मोठय़ा फरकाने संमत झाले. सरकारने डेमोक्रेट्सना अमेरिकेत राहत असलेल्या लाखो अवैध स्थलांतरितांचे भविष्य सुरक्षित करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले. खर्च विधेयकाला सिनेटमध्ये 81-18 आणि प्रतिनिधिगृहात 266-150 च्या अंतराने संमती मिळाली आहे.

काँग्रेसमध्ये बसलेल्या डेमोक्रेट्सना शुद्ध आल्यामुळे ते देशाचे सैन्य, सीमेवर गस्त आणि स्वतःच्या मुलांच्या विम्याला निधी देण्यासाठी तयार झाल्याने मी आंनदी असल्याचे ट्रम्प यांनी स्वतःच्या वक्तव्यात नमूद केले. देशाच्या भल्याचा ठरणार असेल तरच स्थलांतरित विषयक दीर्घकालीन करार करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट
केले.

प्रशासनाची भूमिका कायम

डेमोक्रेट्सना त्यांनी घेतलेली भूमिका किती चुकीची होती, याची जाणीव झाली आहे. सैन्य, सीमागस्त आणि मुलांच्या विम्यासाठी वित्तसहाय्य किती गरजेचे आहे, हे देखील त्यांना ज्ञात आहे. जर लोकांना देशाची सीमा सुरक्षित नको असेल, जर स्थलांतर आणि व्हिसा सोडत व्यवस्थेच्या अडचणी संपविण्याची इच्छा नसल्यास ही मोठी समस्या आहे. अशी घटना भविष्यात देखील घडू शकते. याप्रकरणी ट्रम्प प्रशासनाची भूमिका बदलणार नसल्याचे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी सांगितले.

डेमोक्रेट्सची भूमिका

ट्रम्प सरकार अवैध स्थलांतरितांबद्दल अनेक वेगवेगळी धोरणे आखत असल्याचा आरोप डेमोक्रेट्सनी केला होता. याच धोरणांच्या विरोधात डेमोक्रेट्सनी सरकारच्या अल्पकालीन खर्च विधेयकाला फेटाळले होते. 7 लाख ‘ड्रीमर्स’ना देशातून बाहेर काढले जाऊ नये आणि त्यांचे भविष्य सुरक्षित केले जावे अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु ट्रम्प यांनी त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या होत्या.

ड्रीमर्स

‘डिफर्ड ऍक्शन फॉर चिल्ड्रन अरायव्हल’ योजनेला ड्रीमर्स असे संबोधिले जाते. ही योजना बराक ओबामांनी 2012 मध्ये सुरू केली होती. यात अमेरिकेत पोहोचलेल्या विदेशी मुलांना तात्पुरत्या स्वरुपात वास्तव्य, शिक्षण आणि काम करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

शटडाउनचा प्रभाव

शटडाउनमुळे गृहनिर्माण विभाग, पर्यावरण, शिक्षण आणि वाणिज्य इत्यादी विभागांना सुटी देण्यात आली होती. याशिवाय ट्रेझरी, संरक्षण, वाहतूक, आरोग्य विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक कर्मचाऱयांना घरी बसावे लागले होते.

भूतकाळातील शटडाउन

?याअगोदर ऑक्टोबर 2013 मध्ये 16 दिवसांसाठी काम बंद ठेवावे लागले होते.

?जानेवारी 1996 मध्ये 21 दिवसांचे शटडाउन झाले होते.

?परंतु काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात एकाच पक्षाचे बहुमत असताना शटडाउन होण्याची आताची ही पहिलीच वेळ.

Related posts: