|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बेताळभाटी खून प्रकरणी आरोपीला 48 तासात अटक

बेताळभाटी खून प्रकरणी आरोपीला 48 तासात अटक 

प्रतिनिधी/ मडगांव

कोलवा येथील व्यवसायिक बाप्तिस उर्फ बातू मिंगेल डिकॉस्ता (53 वर्षे) यांचा बेताळभाटी येथील लव्हर्स बीचवर खून केल्याच्या आरोपावरून कोलवा पोलिसांनी एका बांधकाम ठिकाणावर मालवाहू रिक्शा चालविणाऱया अमन गोपाळ काटिल्या (21) या मूळ पुणे व सद्या कोलवा परिसरात राहणाऱया युवकाला अटक करण्यात आली आहे. हा खून समलिंगी प्रकरणातून घडल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले आहे. अवघ्या 48 तासाच या खून प्रकरणाचा शोध लावण्यात कोलवा पोलिसांना यश आले.

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मयत बाप्तिस डिकॉस्ता यांचे अमन काटिल्य या युवकाकडे समालिंगी संबंध होते. या समलिंगी संबंधाला अमन कंटाळला होता. त्याची कल्पना त्याने बाप्तिसला दिली होती. तरीसुद्धा समलिंगी संबंध ठेवण्याची सवय जडलेला बाप्तिस ऐकत नसल्याने अमनने बाप्तिसचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच हा खुनाचा प्रकार घडला.

खून करण्यासाठी सुरा विकत घेतला

बाप्तिस डिकॉस्ताचा खून करण्याचा पक्का निर्णय झाल्यावर अमनने तीन दिवस अगोदर सुरा खरेदी केला. त्यानंतर तो संधीची वाट पाहू लागला. शनिवारी त्याने बाप्तिसकडे संपर्क साधला व भेटण्याचे निश्चित झाले. त्यानुसार दोघेही बेताळभाटी येथे एकत्र आले व लव्हर्स बीचवर गेले. त्या ठिकाणी समलिंगी संबंध ठेवत असतानाच अमिनने धारदार सुऱयाने बाप्तिसच्या गळय़ावर दोन्ही बाजूने वार करून खून केला.

बाप्तिसचा खून केल्यानंतर अमनने त्याच्या अंगावरील सोन्याचे सर्व दागिने काढून घेतले व तो पुन्हा कोलवा येथील आपल्या खोलीवर आला. आपण खून केला याचे कोणतेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार नाही अशी व्यवस्था देखील त्याने केली. मात्र, बाप्तिसचा खून झाला, त्यावेळी त्याच्यासोबत कोणत्या व्यक्ती होत्या, याची पक्की माहिती पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी काल सोमवारी अमनला ताब्यात घेतले व त्याची चौकशी सुरू असता सोमवारी रात्री त्याने आपण बाप्तीसचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. अमनला बेताळभाटी येथील लव्हर्स बीचची बऱयापैकी माहिती होती. आपल्या प्रियसीसोबत अधुनमधून तो या ठिकाणी जायचा, या ठिकाणी बाप्तीसचा काटा काढणे शक्य असल्याचे त्याने हेरले व शनिवारी रात्री बाप्तिसला या ठिकाणी बोलवून घेतले. त्या पूर्वी बाप्तिस ने एका बारमधून तीन दारूच्या बाटल्या तसेच एक प्लॅट चिकन खरेदी केले होते.

अमनने आपण एकटय़ानेच बाप्तिसचा खून केल्याची कबुली दिली असली तरी त्याचे अन्य दोन साथीदार सोबत असावे असा कयास आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला नसल्याने पोलीस लवकरच या प्रकरणातील आणखीन माहिती गोळा करताना पुढील कृती करण्याची शक्यता आहे.

अमनने शाळा अर्ध्यावरच सोडली

अमनचे आई-वडिल मुळचे गुजरातचे, नंतर ते पुण्यात आले. त्याच ठिकाणी अमनचा जन्म झाला. नंतर ते गोव्यात आले. गोव्यात आल्यानंतर त्याच्या आई-वडिलाचा घटस्पोट झाला व ते विभक्त झाले. अमन काही दिवस आपल्या आई सोबत राहिला. पण, एक दिवस आई देखील त्याला सोडून गेली. त्याचा परिणाम अमनवर झाला. पाचवीच्या वर्गात दोन-तीन वेळा नापास झाल्यानंतर त्याने शाळा अर्ध्यावरच सोडून दिली. नंतर तो कुठे काम मिळेल तिथे जाऊ लागला. मध्यंतरी टाईल्स बसविण्याचे काम देखील त्याने केले. नंतर वाहन चालविण्याचा परवाना घेतला व एका बांधकाम ठिकाणावर तो मालवाहू रिक्शा चालवू लागला.

पैशामुळे बाप्तिस च्या संपर्कात आला

बाप्तिस डिकॉस्ता हा व्यवसायिक असल्याने त्याच्याकडे पैसा होता. अनेकांना तो व्याजावर पैसे पण द्यायचा. अमनला जेव्हा पैशांची जरूरी भासली, तेव्हा त्याने बाप्तिसकडे संपर्क साधला व तेव्हापासून दोघांची ओळख झाली. नंतर बाप्तिसने पैशाच्या जोरावर अमिनला आपल्या नादी लावले व त्याच्याकडे समलिंगी संबंध ठेवण्यास प्रारंभ केला. सुरवातीला अमिनने पैशाच्या आशेपोटी या गोष्टी सहन केल्यानंतर मात्र, त्याला या प्रकाराचा कंटाळा आल्याने, त्यात त्याला एक मैत्रिण देखील भेटली होती. त्यामुळे तो आपली सुटका करण्यासाठी प्रयत्न करत होता.

सोन्याचे दागिने व सुरा जप्त

बाप्तिसचा  खून केल्यानंतर अमनने सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम आपल्या खोलीत लपवून ठेवली होती. तसेच सुरा खून केल्यानंतर लव्हर्स बीचवर झुडूपात फेकून दिला होता. त्याच बरोबर खून करताना घातलेले कपडे देखील त्याने लपवून ठेवले होते. या सर्व गोष्टी काल पोलिसांनी ताब्यात घेतल्या. अमनने लपवून ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच रोख दहा हजार तसेच दोनशे डॉलर त्याच्याकडे सापडले. कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक फिलोमेना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिरोडकर, उपनिरीक्षक स्मिता मोरजकर, एएसआय शशिकांत देसाई यांनी सोन्याचे दागिने, पैसे व सुऱयाचा तपास लावला.

तपास लावण्यासाठी मोठे पथक स्थापन केले

या प्रकरणाचा 48 तासात तपास लावण्यात पोलिसांना यश आले. त्यासाठी पोलिसांना बरेच कष्ट घ्यावे लागले. या खुनाचा कोणताच ठोस असा पुरावा उपलब्ध नव्हता, त्यामुळे तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी मोठे पथक स्थापन केले. त्यात उपअधीक्षक राजू राऊत देसाई, कोलवाचे निरीक्षक फिलोमेना कॉस्ता, मडगावचे निरीक्षक कपिल नायक, कुंकळळीचे निरीक्षक सुदेश नाईक, कुडचडेचे निरीक्षक रवींद्र देसाई, पोलीस हवालदार गौरक्ष गांवस, अविनाश नाईक याचा देखील समावेश होता. सर्व अधिकाऱयांनी आपआपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली व आरोपीला गजाआड केले. यात तंत्रज्ञाचा आधार देखील घेण्यात आला. आरोपी मोबाईल वापरत होता. ज्या दिवशी खून झाला, त्या दिवशी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन कुठे होते, हे शोधून काढण्यात आले व हेच तंत्रज्ञान महत्वाचे दुवा ठरले.