|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जि.पं. सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ

जि.पं. सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ 

सदस्यांच्या सभात्यागामुळे सर्वसाधारण बैठक बरखास्त, पाणी प्रश्नासह सदस्यांचे अनुदान वाटपावरून सभागृहात आंदोलन

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हा पंचायतच्या सर्वसाधारण सभेत पाणी प्रश्नावरून गदारोळ झाला. यामुळे मंगळवारी बोलाविण्यात आलेली बैठक बरखास्त करण्याची वेळ आली.  सदस्यांना अनुदानही नाही आणि अधिकारही नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. यामुळे जिल्हा पंचायत बरखास्त करा, अशी जोरदार मागणी बहुसंख्य सदस्यांनी केली. आणि अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजीही केली. यामुळे सभागृह चालविणे अशक्मय बनले होते. बहुसंख्य सदस्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा विरोध दर्शवून सभात्याग केला.

बैठकीस सुरुवात होताच शंकर माडलगी यांनी पिण्याच्या पाण्याबाबत जि. पं. कडून सरकारला पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रस्तावावर अद्यापही सरकारकडून उत्तर आले नसल्याचे उत्तर मिळताच माडलगी यांच्यासह अन्य सदस्यांनी संताप व्यक्त केला. सर्व कामे आमदारांच्या मर्जीनुसारच होत आहेत. सदस्यांनी दिलेल्या कृती आराखडय़ाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सदस्यांना भरीव अनुदान नाही आणि हक्क व अधिकारही नाहीत, यामुळे जि. पं. सदस्यांचा उपयोग तरी काय? आमदारांना एकीकडे पाणी प्रश्नासाठी 2 कोटीचे अनुदान उपलब्ध होत असताना जि. पं. सदस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, असा आरोप सदस्यांनी केला.

यावेळी अजित चौगले, सिद्धप्पा मुदक्कण्णवर, गुराप्पा दाशाळ, ऍड. रमेश देशपांडे, राजेंद्र पवार, गोविंद कोप्पद, जयराम देसाई, सरस्वती पाटील, माधुरी हेगडे आदींसह बहुसंख्य सदस्यांनी राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविला.

 जोरदार गोंधळ

जितेंद्र मादार यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.  शंकर माडलगी यांनी जि. पं. सदस्यांच्या न्याय हक्काबाबत सर्वपक्षीय सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घालून धरणे आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर येऊन आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी जोरदार गोंधळ माजला. जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर. यांनी सदस्यांना बराच वेळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. धरणे धरल्याने समस्या सुटणार नसून आपल्या मागण्या सरकारला कळविण्याचे सांगितले. मात्र सदस्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. या आंदोलनात उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांनीही सहभाग घेतला. 

सभागृहात प्रचंड वादावादी, आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी झाल्याने सुमारे अर्धा तासभर गोंधळाचे वातावरण सुरू होते. संपूर्ण राज्यातील जिल्हा पंचायतींना अनुदान येण्यास विलंब झाल्याचे रामचंद्रन आर. यांनी सांगितले. मात्र सदस्यांनी आपला हक्क हिरावून घेण्याचा आरोप करून कोणत्याही परिस्थितीत बैठक होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आणि सभात्याग केला. सभागृहातील बहुसंख्य सदस्यांनी सभात्याग केल्याने मंगळवारची सर्वसाधारण सभा बरखास्त करावी लागली.    

यानंतर अध्यक्षा आशा ऐहोळे यांच्या कक्षात बैठक घेण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून आपण पक्षभेद विसरून सर्व सदस्यांसाठी काम करीत असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले. पिण्याच्या पाण्यासंदर्भात आपण सरकार दरबारी अनेकदा प्रयत्न केले आहेत. जिल्हय़ासाठी आपण काम करणार असून स्वत:साठी नाही. जिल्हय़ातील सर्व 90 सदस्यांच्या मतदार संघातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. मात्र यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. सदस्यांनी पाणी प्रश्नावर सभा बरखास्त करण्याचा ठराव इतिवृत्तात मांडण्यात यावा, असा आग्रह धरला.

Related posts: