|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोकण रेल्वे मान्यता प्राप्त संघटनेसाठी आज फैसला

कोकण रेल्वे मान्यता प्राप्त संघटनेसाठी आज फैसला 

मतदान शांततेत, आज लागणार निकाल

वर्चस्वासाठी चारही कर्मचारी युनियनची प्रतिष्ठा पणाला

प्रतिनिधी /रत्नागिरी

कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेसाठी बुधवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीसाठी बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीची मोजदाद करण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र हे मतदान सुमारे 55 टक्केपर्यंत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मतदानाचा आज गुरूवार 25 जानेवारी रोजी निकाल लागणार आहे.

कोकण रेल्वे मान्यता प्राप्त संघटनेसाठी बुधवारी 24 जानेवारी रोजी झालेल्या मतदानासाठी कोकण रेल्वेतील चारही संघटना एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. गतवेळी एकमेकांशी युती असलेल्या संघटना यावर्षी समोरासमोर आपल्या वर्चस्वासाठी रिंगणात उतरल्याने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीकडे साऱयांचे लक्ष वेधले आहे. या मान्यता प्राप्त युनियनच्या निवडणुकीत कोलाड ते ठोकूरपर्यंतच्या कोकण रेल्वे प्रशासनातील सुमारे 4 हजार 800 पेक्षा अधिक कामगारांचे मतदान झाले. चार संघटनांमध्ये चुरस असली तरी पुन्हा लाल बावटा संघटना बाजी मारणार असल्याची शक्यता रेल्वे गुप्तचर विभागाकडून व्यक्त केली जात आह़े

या निवडणुकीत कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेसाठी नॅशनल रेल्वे मजदुर युनियन (लाल बत्ती), कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियन, रेल कामगार सेना, कोकण रेल्वे मजदुर संघ या संघटना स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत़ त्यामुळे कोणती संघटना बाजी मारणार, याकडे साऱयांचे लक्ष वेधले आहे. गुरूवार 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या मतमोजणीला रत्नागिरी कोकण रेल्वे विभागीय कार्यालय येथील केंद्राच्या ठिकाणी होणार असल्याचे सांगण्यात आले.