|Friday, January 18, 2019
You are here: Home » क्रिडा » तिसऱया विजयासह आनंद पाचव्या स्थानी

तिसऱया विजयासह आनंद पाचव्या स्थानी 

वृत्तसंस्था /विज्क आन झी (हॉलंड) :

रॅपिडमधील वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथन आनंदने इंग्लंडच्या ग्वेन जोन्सचा 10 फेरीत पराभव करून टाटा स्टील मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत पाचव्या स्थानावर झेप घेतली. या स्पर्धेतील त्याचा हा तिसरा विजय आहे.

या विजयानंतर आनंद आता आघाडीवर असणाऱया खेळाडूंपेक्षा केवळ एका गुणाच्या फरकाने मागे आहे. त्याचे 6 गुण झाले असून अनिश गिरी, मॅग्नस कार्लसन, शाख्रियार मॅमेडॅरोव्ह यांचे प्रत्येकी 7 गुण झाले आहेत. या स्पर्धेच्या अद्याप तीन फेऱया बाकी असून आनंदला पहिले स्थान मिळविण्यासाठी चमकदार प्रदर्शन करावे लागणार आहे. विश्रांतीच्या दिवसानंतर त्याची लढत तळाच्या स्थानी असणाऱया चीनच्या यिफान होयुशी होणार आहे. आनंदने जोन्सवर काळय़ा मोहरांनी खेळताना विजय मिळविला. या फेरीत गिरी व सर्जी कर्जाकिन यांचा डाव अनिर्णीत राहिला तर कार्लसनने अमेरिकेच्या वेस्ली सोवर विजय मिळविला. मॅमेडॅरोव्हने रशियाच्या पीटर स्विडलरवर मात केली तर रशियाच्या क्रॅमनिकनेही त्याचाच देशवासी मॅक्सिम मॅटलाकोव्हला हरवित चौथे स्थान मिळविले. बी. अधिबन व यिफान होयु यांचा डावही अनिर्णीत राहिला.

चॅलेंजर्स विभागात विदित गुजराथीने मास्टर्स विभागात स्थान मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असून त्याने जेफरी झिआँगविरुद्धचा डाव बरोबरीत राखत युपेनच्या अँटोन कोरोबोव्हसमवेत 7 गुणांसह संयुक्त अग्रस्थान मिळविले आहे. गुजराथी व कोरोबोव्ह यांच्यात पुढील फेरीत लढत होणार आहे. त्यात गुजराथीला पांढऱया मोहरांनी खेळण्याची संधी मिळणार आहे. यात विजय मिळविल्यास त्याला पहिले स्थान मिळेल आणि डाव अनिर्णीत राहिला तरी त्याला आशा करता येणार आहे.

Related posts: