|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कर्नाटकात पाणी वळविण्यासाठी 10 मीटर खोल नाला

कर्नाटकात पाणी वळविण्यासाठी 10 मीटर खोल नाला 

प्रतिनिधी/ पणजी

विधानसभेचे सभापती प्रमोद सावंत यांनी उपसभापती मायकल लोबो व अन्य दोन आमदारांसह कणकुंबी येथे भेट देऊन कळसा भंडुरा नाल्याची पाहणी केली. कणकुंबी येथील स्थिती पाहून सभापती सावंत यांनाही धक्का बसला. म्हादईचे पाणी मलप्रभेत वळविण्यासाठी कर्नाटकने आवश्यक ती सर्व कामे केली असून म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवू देणार नाही, या गोव्याच्या भूमिकेला कोणताच अर्थ राहिला नसल्याचे सावंत यांनी गोव्यात परतल्यावर स्पष्ट केले. म्हादईचे पाणी नव्हे तर पावसाचे पाणीही मलप्रभेत वळावे याबाबतची तरतूद कर्नाटकने केली असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

काल रविवारी सभापती प्रमोद सावंत, उपसभापती मायकल लोबो, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार प्रसाद गावकर व म्हादई बचाव अभियानचे प्रा. राजेंद्र केरकर यांनी कणकुंबी येथे जाऊन कळसा भंडुरा नाल्याची पाहणी केली. यावेळी अन्य 40 जण उपस्थित होते. दुपारी 1 वाजेपर्यंत सावंत व अन्य आमदारांनी कळसा भंडुरा नाल्याची पाहणी केली. कणकुंबीला भेट देणार याबाबत सभापतींनी कर्नाटकला कल्पना दिली होती. त्यामुळे कर्नाटकची माणसेही यावेळी उपस्थित होती.

पत्रकार, व लोकांना केला मज्जाव

कळसा व भंडुरा नाल्याची पाहणी करण्यासाठी सभापती, उपसभापती व अन्य आमदार पोहोचताच तेथील सुरक्षारक्षकांनी पत्रकार व लोकांना मज्जाव केला. केवळ सभापती व इतरांना जाऊ दिले. कळसा भंडुरा नाल्याची पाहणी केल्यानंतर सभापती मलप्रभेच्या प्रवाहापर्यंत जायला पाहत होते, मात्र काही थातूरमातूर कारणे सांगून व तेथे जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याचे कारण सांगून त्यांना तेथे जाण्यापासून मज्जाव करण्याचा पुरेपुर प्रयत्न करण्यात आला.

सगळे पाणी कर्नाटकच्याच बाजूने जाणार

कर्नाटकच्या बाजूने मलप्रभा नदीपर्यंत 10 मीटर खोल नाला खोदण्यात आला आहे. 5 किलोमीटर लांबीचा हा नाला थेट मलप्रभेला जोडला गेला आहे. गोव्याच्या बाजूने पाणी येण्यासाठी असलेला नाला 10 मीटर उचीवर आहे तर मलप्रभेच्या बाजूने जाणारा नाला 10 मीटर खोल आहे. त्यामुळे गोव्याच्या बाजूला पाणी येऊच शकणार नसल्याची तरतूद कर्नाटकने केली आहे. उंचावर असलेल्या गोव्याच्या बाजूच्या नाल्यात पाण्याचा प्रवाह येणे कठीण आहे. मातीचा भराव 25 मीटर उंच आहे. त्यामुळे खाली किती खोल केले आहे याचा अंदाज येणे कठीण आहे. एकूण केलेले खोदकाम आणि मातीचा भराव पाहता पावसाचे पाणी मलप्रभेच्या बाजूनेच जाणार आहे. कळसा नदीत खोदकाम करून या नदीची कर्नाटकने पूर्णपणे वाट लावली आहे.