|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घ्या

कारागृहांच्या सुरक्षेचा आढावा घ्या 

सीआरपीएफ’ तैनात करण्याचेही निर्देश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

श्रीनगर मध्यवर्ती कारागृहातील दहशतवाद्याने पलायन केलेल्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यातील सर्व कारागृहांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्या. तसेच कारागृहातील अंतर्गत सुरक्षेसाठीही केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान तैनात करा, असा आदेश शुक्रवारी जम्मू-काश्मीर सरकारला दिल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱयांनी दिली.

पाकिस्तानचा दहशतवादी नावीद जाट हा श्रीनगर मध्यवर्ती कारागृहामध्ये होता. उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. हॉस्पिटलवर हल्ला करत दहशतवाद्याने त्याची सुटका केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत दोन पोलीस हुतात्मा झाले होते. या घटनेची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे.   कारागृहांमधील सुरक्षेचा आढावा घ्या, त्याचबरोबर नावीद याला हॉस्पिटलमध्ये पाठविण्याचा निर्णय कोणत्या आधारांवर घेतला याचीही तपासणी करा, असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिला आहे. सध्या श्रीनगर मध्यवर्ती कारागृहात पाकिस्तानचे 16 कैदी आहेत. यातील सात कैदींना जम्मूतील कारागृहात हलविण्यात आले आहेत.अन्य कैद्यांनाही दुसऱया कारागृहात पाठविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. कारागृहांच्या बाहेर तसेच आतमध्ये  सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा तैनात करा, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीर सरकारकडूनही याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.