|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर

आता कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर 

अत्याधूनिक यंत्रणेच्या वापरातूक होणार नियोजन

अनंत कंग्राळकर/ बेळगाव

बेळगाव शहराला स्मार्ट बनविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून नवनवे  प्रयोग करण्याची योजना लवकरच मार्गी लागणार आहे. यामध्ये शहराशी संबधित सर्वच घटकांचे आधुनिकीकरण करण्यासाठी 156 कोटी रूपयाचा प्रस्ताव राबविण्यासाठी निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत. तसेच यांच्या नियोजनासाठी कंट्रोल कंमाड सेंटरची स्थापना करण्यात येणार आहे.

स्मार्टसिटी योजनेमधून विविध प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव असून याची अंमलबजावणी करण्यास प्रारंभ झाला आहे. योजनेला मंजूरी मिळूनही विकासकामे राबविण्यात आली नाहीत. स्मार्टसिटी योजनेची अंमलबजावणी केव्हा होणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते. मात्र योजनेच्या अंमलबजावणीस प्रारंभ करण्यात आला असून स्मार्ट सुविधा उपलब्ध करण्यासह नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा सुलभ करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. स्वच्छता, वाहतुक रहदारी, स्मार्ट पार्किंग सुविधा, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा अशा विविध सुविधा संगणक प्रणालीव्दारे जोडण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे नागरिकांना आपल्या हातामधील स्मार्ट फोनव्दारे सुविधांचा लाभ मिळणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. तक्रारीचे निवारण स्मार्ट सोलुशनच्या कमांड ऍन्ड कंट्रोल केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. हे केंद्र विश्वेश्वर नगर येथे स्थापण करण्यात येणार आहे. केंद्राच्या इमारतीकरिता 3 कोटी 35 लाखाची तरतूद करून इमारत उभारणीच्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पण सध्या तात्पुरते महापालिकेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात येणार आहे. याकरिता स्मार्टसिटी योजनेमधून 157 कोटी रूपयाचा प्स्त्राव राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्यात 76 कोटीचा प्रस्ताव राबविण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. दुसऱया टप्यात पाणी पुरवठा आणि हेस्कॉम संदर्भातील इ-मीटर सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. 

शहरातील स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी होत असतात. तसेच कचऱयाची उचल वेळेत केले नसल्याच्या तक्रारीच तर रोजच होत असतात. या तक्रारीचे निवारण स्मार्ट सोलुशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी आणखीन कॅमरे बसविण्यात येणार आहेत. तसेच सेंन्सर्सचा वापर करून संगणक प्रणालीव्दारे स्वच्छता कामावर नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या कचराकुंडीमधील कचऱयाची उचल केली जात नाही. अशा वेळी कॅमेऱयाव्दारे नजर ठेवून परिसरातील कचरा वाहनचालकांला सुचना देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक कचरावाहू वाहनाला जीपीआरएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. जर कचरावाहून नादुरूस्ती झाल्यास त्याची माहिती याव्दारे मिळु शकते. यामुळे अन्य कचरावाहू वाहनाला सुचना देवून कचऱयाची उचल वेळेत करता येणे शक्मय आहे.

शहरातील रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढत आहे, ठिकठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होत असतात. यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणेचा वापर होणार आहे. कमांड ऍन्ड कंट्रोल सुविधेअंतर्गत शहरातील रहदारीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही रस्त्यावर अपघात झाल्यास किंवा वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास याची माहिती कमांट ऍन्ड कंट्रोल केंद्राला लागलीच मिळण्याची यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तसेच या यंत्रणेव्दारे परिसरातील रहदारी पोलीसांना सुचना देवून वाहतूक वळविता येवू शकते. तसेच शहरात ठिकठिकाणी अलार्म बटण उपलब्ध करण्यात येणार आहे. जर कोणत्याही परिसरात दंगल किंवा कोणताही अनर्थ घडल्यास अलार्म बटण दाबल्यास त्याची माहिती केंद्रात मिळणार आहे. त्यानंतर स्पिकरव्दारे नागरिकांना सुचना देण्यात येणार आहे. याकरिता ठिकठिकाणी स्पिकर बसविण्यात येणार आहेत.

बाजारपेठेत पार्किंगची सुविधा अपुरी असल्याने बापट गल्ली येथे बहुमजली पार्किग तळ उभारण्यात येणार आहे. पार्किग तळ उभारण्याचे कंत्राट देण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. पण वाहने पार्क करण्यासाठी नागरिकांना रहदारीमधून बाजारपेठेत यावे लागते. पार्किग करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यास पुन्हा माघारी परतावे लागते. अशावेळी स्मार्ट पार्किग सुविधेचा वाहनधारकांना होवू शकतो. वाहनधारक ज्यावेळी वाहन पार्क करण्यासाठी जातो, त्यावेळी स्मार्ट यंत्रेणेव्दारा पार्किग तळावर जागा उपलब्ध आहे का? याची चाचपणी मोबाईलव्दारे पाहू शकतात. याकरिता ऍपदेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. पण सध्या संपुर्ण शहरात एकच पार्किग तळा असल्याने अद्यापही काही ठिकाणी बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी जागांचा शोध घेतला जात असल्याचे महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी सागितले.

भूमिगत विद्युत वाहिन्या घालण्याचे काम करण्यात येत आहे. तर भविष्यात इ- मीटर सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच विद्युत पुरवठय़ाची संपुर्ण माहिती नागरिकांना घरबसल्या मिळणार आहे. शहरात होणाऱया पाणी पुरवठय़ाबाबतची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. याकरिता इ-मीटर सुविधा सुरू करण्यात येणार आहे. परिवहन सुविधादेखील हायटेक होणार असून याकरिता बसेसना जीपीआरएस सुविधा बसविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच सिटी बसस्थानकाचा कायापालट होणार आहे. बसथांब्यावर डिजीटल फलकाव्दारे बसबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. कोणती बस कोणत्या बस स्थानकावर  आहे. प्रतिक्षा करीत असलेल्या बसथांब्यावर येण्यास किमी वेळ लागणार आहे. याबाबतची माहिती फलकावर तसेच मोबाईल ऍपव्दारा मिळणार आहे. अशा विविध सुविधा स्मार्टसिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱया कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर सुविधेमार्फत मिळणार आहे. 

Related posts: