|Monday, July 22, 2019
You are here: Home » क्रिडा » कॅनडा, अमेरिका महिला हॉकी संघांचे विजय

कॅनडा, अमेरिका महिला हॉकी संघांचे विजय 

भारताचा शिवा केशवन 34 व्या स्थानावर

वृत्तसंस्था/ पेनॉगचेंग

दक्षिण कोरियातील पेनॉगचेंग येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या आईस हॉकी या क्रीडाप्रकारात कॅनडा आणि अमेरिका यांनी विजयी सलामी दिली. पुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात भारताच्या शिवा केशवनला तिसऱया फेरीअखेर 34 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. गेल्या दोन दशकांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया शिवा केशवनने आपल्या क्रीडा कारकीर्दीला निरोप दिला आहे.

महिलांच्या आईस हॉकी या क्रीडाप्रकारात आतापर्यंत सुवर्णपदके मिळविणाऱया कॅनडा आणि अमेरिकेच्या महिला संघांनी रविवारी विजयी सलामी दिली. कॅनडा महिला संघाने रशियाचा 5-0 असा पराभव केला तर दुसऱया एका सामन्यात अमेरिकेने फिनलँडचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. कॅनडा आणि रशिया यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत कॅनडाने रशियावर 3-0 अशी आघाडी घेतली होती. कॅनडातर्फे रिबेका जॉनस्टन आणि मेलोडी डेओस्ट यांनी प्रत्येकी दोन गोल नोंदविले. फिनलँड आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात फिनलँडने पूर्वार्धात गोल करून अमेरिकेवर आघाडी घेतली होती पण उत्तरार्धात केंडॉल कॉनी आणि मोरँडो यांनी प्रत्येकी एक गोल करून आपल्या संघाला आघाडीवर नेले डॅनी कॅमेरेनेसीने अमेरिकेचा तिसरा आणि निर्णायक गोल केला.

पुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात भारताच्या शिवा केशवनला तिसऱया फेरीअखेर 34 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. शिवाला या क्रीडा प्रकारात पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. त्यामुळे त्याला पदकासाठीच्या चौथ्या आणि शेवटच्या फेरीपासून वंचित व्हावे लागले. 36 वर्षीय केशवनची ही सहावी आणि शेवटची हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा ठरली. तिसऱया फेरीत एकूण 40  स्पर्धकांचा समावेश होता, त्यामध्ये केशवन 34 व्या स्थानावर राहिला.

पुरूषांच्या ल्युज सिंगल्स या क्रीडाप्रकारात ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड ग्लेरस्केरने सुवर्णपदक, अमेरिकेच्या ख्रिस मॅझडेरने रौप्यपदक तर जर्मनीच्या ल्युडविगने कांस्यपदक मिळविले.