|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आतंकवादी होण्यापासून 86 तरुणांना एटीएसने केले परावृत्त

आतंकवादी होण्यापासून 86 तरुणांना एटीएसने केले परावृत्त 

प्रतिनिधी/ सोलापूर

देशापलीकडचे आतंकवादी हे दहशतवादी यंत्रणा वाढविण्यासाठी भारतातील तरुणांना लक्ष्य करीत आहेत. धर्माच्या नावावर त्यांची माथी भडकवून तरुणांनाकडूनच आतंकवाद्याच्या कारवाया करवून घेतले जात आहे. तर आतंकवादी बनण्याच्या मार्गावर असणाऱया 87 तरुणांना बाहेर काढण्यात एटीएस पथकाला यश आले आहे. आता ते सर्व तरुण आपापले सामाजिक जीवन सुरळीतपणे जगत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र आतंकवादी विरोधी पथकाचे अतिरीक्त महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.

पोलीस आयुक्तालय येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण, पौर्णिमा चौगुले आणि अपर्णा गिते आदी उपस्थित होते.

आतंकवादी कारवाया करण्याचे तंत्रही आता बदलत चालले आहे. पाकमधील दहशतवादी आता थेट भारतात येवून हल्ले करीत नाहीत, तर इथल्याच तरुणांचा वापर करुन घेत आहेत. यासाठी इंटरनेटचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. काही विशिष्ट तरुणांवर लक्ष्य ठेवून त्यांना इंटरनेटने संपर्क केला जातो. सुरूवातीला कडवे धार्मीक ज्ञान दिले जाते. नंतर आपल्या धर्मावर होणारा अन्याय सांगिलते जाते. तसेच जगभर आपले काम कसे सुरू आहे त्यासाठी नेमके कोणती कामे केली पाहिजे हे दाखविले जाते. अशा रितीने कमीत कमी चार ते पाचजण इंटरनेटद्वारे तरूणांना आतंकवादी बनण्याचे प्रशिक्षण देतात, असे अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.

याला सामना करण्यासाठी सायबर शाखा मजबूत असणे गरजेचे आहे. त्या अनुशंगाने सर्व पोलीस अधिकाऱयांना प्रशिक्षण दिले जात आहे. शासनाने देखील प्रत्येक जिह्यात एक सुसज्ज सायबर लॅब व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. नुकतेच यासाठी तब्बल 850 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आतंवाद्यांनी संपर्कासाठी जो नवीन तंत्रज्ञान वापरतील त्यावर लक्ष ठेवण्यास मदत होते. परंतु आतंवादी होण्याच्या मार्गावर असणाऱया तरुणांना बाहेर काढणे हेदेखील महत्त्वाचे कार्य आहे. कोणत्याही चुकीच्या माणसाला ताब्यात घेतले जात नाही. शासन व प्रशासन हे समाजातील सर्व घटकांचे असतात.

गुन्हा दाखल करणे हा शेवटचा पर्याय

धर्माच्या नावावर तरूणांना लक्ष्य केले जात आहे. यात बहुतांश तरुण हे 12 वी ते उच्चशिक्षीत आहेत. यामध्ये अडकलेल्या तरुणांवर लगेच कारवाई करुन गुन्हा दाखल केला जात नाही. गुन्हा दाखल करणे हा शेवटचा पर्याय आहे. त्यांना समुपदेशन करून योग्य मार्गदर्शन करणे, रोजगार मिळवून देणे आणि जीवनाची खरी ओळख करुन देण्याचे काम आम्ही करतो. आणि पर्यायच नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो, असेही कुलकर्णी यावेळी म्हणाले.

सोलापुरात एटीएसची स्वतंत्र शाखा

नवी मुंबईसह सोलापूरसाठी एटीएसचे स्वतंत्र शाखा उघडण्यात आले आहे. सोलापुरच्या कक्षेसाठी ग्रामीण पोलिसांकडून जागा घेण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काम सुरू असून दहशतवादी कारवायाबाबत बैठक देखील घेण्यात आली आहेत. येथील टीमसोबत बैठक घेवून त्यांना एकत्रित काम करण्यास सांगितले असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

पोलीस-नागरिक संवाद आवश्यक

यावेळी कुलकर्णी म्हणाले, नागरिकांच्या सहकार्याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश मिळत नाही. यासाठी आपल्या अवतीभवती असलेल्या लोकांवर आणि संशयीतरित्या होणाऱया हालचालीवर नागरिकांनी लक्ष दिले पाहिजे. कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम होत असेल तर याचीही खबर पोलिसांना दिली पाहिजे.

Related posts: