|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चीनी तंत्रज्ञाच्या खुनामुळे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

चीनी तंत्रज्ञाच्या खुनामुळे प्रकल्पावर प्रश्नचिन्ह 

पाकशी संबंध ताणणार, सुरक्षेची चिंता मोठी  

  वृत्तसंस्था / बिजिंग

पाकिस्तानातील चीनच्या महत्वाकांक्षी कॉरिडॉर प्रकल्पावर काम करणाऱया चेन झू या चीनी तंत्रज्ञाची तीन दिवसांपूर्वी पाकिस्तानातील कराची येथे हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे 50 अब्ज डॉलर्सच्या या भव्य प्रकल्पाला खीळ बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तंत्रज्ञांच्या सुरक्षेची जबाबदारी पाकिस्तानची असल्याचे चीनचे म्हणणे आहे. गेल्या तीन वर्षात अशा प्रकारे सहा चीनी तंत्रज्ञांची हत्या पाकिस्तानात  करण्यात आली आहे.

सध्या पाकिस्तानात चीनचे 20 हजारांहून अधिक नागरीक कामानिमित्त आले आहेत. त्यांच्या सुरक्षेची चिंता चीनला वाटते. चीनच्या प्रकल्पाला पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथे मोठा विरोध होत आहे. या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ पाकच्या पंजाब प्रांताला आणि तेथील नागरीकांना मिळणार असून इतर प्रांतांमधील नैसर्गिक संपत्तीचे फक्त शोषण केले जाईल, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रांतांमध्ये चीनी तंत्रज्ञांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे.

तथापि, कराची सारख्या सुरक्षित शहरांमध्येही आता हे प्रकार वाढल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असल्याचे चीनचे मत आहे. पाकिस्तानने चीनी कर्मचाऱयांना काही प्रमाणात लष्करी सुरक्षाही पुरविली आहे. तथापि, ती अपुरी आहे. पाकने त्यांच्या सुरक्षेसाठी 15 हजार सैनिकांची तुकडी तयार केली आहे. तथापि, सर्वांना सुरक्षा देणे निव्वळ अशक्य असल्याचेही मान्य करण्यात आले आहे. हा कॉरिडॉर प्रकल्प चीनच्या वन रोड वन बेल्ट या प्रकल्पाचा एक भाग आहे. वन रोड वन बेल्ट प्रकल्प सुमारे 40 देशांना जोडणार असून या सर्व देशांची अवस्था चीनचे मांडलीक अशीच होणार आहे. चीनने या देशांमध्ये केलेल्या अवाढव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे त्या देशांचे स्वतंत्र आर्थिक अस्तित्व संपणार असून ते कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातील, अशी शक्यता या देशांमधील अनेक तक्ष बोलून दाखवित आहेत. शिवाय ही गुंतवणूक या देशांच्या दीर्घकालीन आर्थिक हिताची काळजी करत नाही. ती केवळ चीनच्याच हितासाठी आहे, असा सूर उमटू लागल्याने स्थानिक नागरीकांचा विरोध या प्रकल्पांना वाढत आहे.

Related posts: