|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » शिवसेना-भाजपमध्ये ‘नीरव’ टिवटिव

शिवसेना-भाजपमध्ये ‘नीरव’ टिवटिव 

नीरव मोदींवरून राऊत आणि शेलार आमने-सामने

पीएनबी घोटाळय़ाचे प्रकरण

मुंबई / प्रतिनिधी

पंजाब नॅशनल बँकेतील जवळपास 11 हजार कोटी रुपयांच्या महाघोटाळय़ाचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीच्या पलायनावरून शिवसेना आणि भाजपमध्ये शनिवारी ट्विटरवर जोरदार खडाजंगी झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी आडनावावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरसंधान सोडल्याने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार हे चांगलेच संतापले. शेलार यांनीही ट्विटरवरून राऊत यांच्या टीकेचा समाचार घेतला.

‘ललित मोदी आणि नीरव मोदी हे दोघेही देश सोडून पळून गेले. तिसरा येऊन-जाऊन असतो’, असे ट्विट राऊत यांनी आज केले. त्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपच्या वर्तुळात उमटली. शेलार यांनी लगेच ट्विट करून राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

‘काहींना प्रभादेवीच्या गल्लीत बसून मोदी या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य सूचले. तेव्हा कळले आता शिमगा जवळ आला आहे. वर्षभर यांचा शिमगा असतो. मग उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करता. तीच थुंकी तुमच्याच तोंडावर पडू नये म्हणजे झालं’ असे ट्विट शेलार यांनी केले आहे. त्यांनी आपले ट्विट संजय राऊत यांना टॅग केले आहे.

केंद्रात आणि राज्यातील सत्तेत एकत्र असून शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटी रुपयांना गंडवल्यानंतर विरोधकांनी भाजपवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेने सुध्दा भाजपला झोडपले आहे.

नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा

दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेला चुना लावणाऱया नीरव मोदीला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करा, असा उपरोधिक सल्ला शिवसेनेने शनिवारी आपल्या ‘सामना’ मुखपत्रातून दिला आहे. शे-पाचशे रुपये कर्जाचा हप्ता फेडता येत नाही म्हणून राज्यात-देशात शेतकरी आत्महत्या करतो. त्याच्या घरादारावर जप्तीचा नांगर फिरतो. पण देशातील बनेल उद्योगपतींनी बँकांची दीड लाख कोटींची लूट केली तरीही हे सगळे दरोडेखोर सुखरूप आहेत. देश सध्या जाहीरातबाजीवर चालला आहे. प्रसिध्दी आणि जाहिरातबाजी यावर हजारो कोटींचा खर्च सुरू आहे. देशलुटीच्या कथा आणि दंतकथा रघुराम राजन यांनी समोर आणल्या. तेव्हा त्यांना गव्हर्नर पदावरून घालवण्यात आले. आता रिझर्व्ह बँकेच्या चेअरमनपदी नीरव मोदीला बसवा म्हणजे देशाची अखेरची निरवानिरव करता येईल, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

Related posts: