|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडक

महाराष्ट्राची उपांत्यपूर्व फेरीत धडक 

विजय हजारे करंडक स्पर्धा : केरळावर 98 धावांनी विजय, नौशाद शेखचे अर्धशतक

वृत्तसंस्था/ बिलासपूर

येथे सुरु असलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत शनिवारी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने केरळ संघावर 98 धावांनी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. खराब हवामानामुळे 37 षटकांच्या झालेल्या या लढतीत महाराष्ट्राने प्रारंभी 8 बाद 273 धावा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना केरळ संघाचा डाव 29.2 षटकांत 175 धावांवर संपुष्टात आला. नौशाद शेखचे अर्धशतक (76) व श्रीकांत मुंढे (26 धावांत 5 बळी) हे महाराष्ट्राच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रासमोर मुंबईचे आव्हान असेल.

प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मुर्तझा ट्रंकवाला (15) धावा काढून बाद झाला. ऋतुराज गायकवाड (28) व कर्णधार राहुल त्रिपाठी (15) हे स्वस्तात बाद झाल्याने महाराष्ट्र 3 बाद 76 अशा अडचणीत सापडला होता. पण, अंकित बावने व नौशाद शेख जोडीने चौथ्या गडय़ासाठी 100 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. बावनेने 43 धावा केल्या. नौशादने अर्धशतकी खेळी साकारताना 56 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 76 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर निखिल नाईक (16), हिमंगणकेर (37), श्रीकांत मुंढे (11) यांच्या शानदार खेळीमुळे महाराष्ट्राला 37 षटकांत 8 बाद 273 धावापर्यंत मजल मारता आली. केरळ संघातर्फे संदीप वॉरियर व अभिषेक मोहन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

प्रत्युतरात खेळताना श्रीकांत मुंढे (26 धावांत 5 बळी) व स्वप्नील बच्छाव (46 धावांत 2 बळी) यांच्या भेदक माऱयासमोर केरळ संघाचा डाव 29.2 षटकांत 175 धावांवर आटोपला. केरळ संघातर्फे संजू सॅमसनने सर्वाधिक 46 धावा फटकावल्या. कर्णधार सचिन बेबी (22) व अरुण कार्तिक (23) धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज मात्र ठराविक अंतराने बाद होत गेल्याने केरळाचा डाव 175 धावांवर गुंडाळला गेला. महाराष्ट्रातर्फे मुंढेने 5, बच्छाव 2 तर संकलेचा, धुमाळ व हिमंगणकेर यांनी प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : महाराष्ट्र 37 षटकांत 8 बाद 273 (ऋतुराज गायकवाड 28, अंकित बावने 43, नौशाद शेख 76, हिमंगणेकर 37, संदीप वॉरियर 2/74, अभिषेक मोहन 2/54).

केरळ 29.2 षटकांत सर्वबाद 175 (संजू सॅमसन 46, सचिन बेबी 22, अरुण कार्तिक 23, श्रीकांत मुंढे 5/26, बच्छाव 2/46).