|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चांगल्या कामासाठी जनतेने पोलिसांना पाठबळ द्यावे

चांगल्या कामासाठी जनतेने पोलिसांना पाठबळ द्यावे 

प्रतिनिधी/ मडगाव

 पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाची जनतेकडून पावती मिळाल्यास डोळे दिपून जाईल असे कार्य पोलीस करु शकतात असे उद्गार दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी काढले.

मडगावातील एक प्रतिष्ठीत नागरीक ऍड. माधव बांदोडकर यांनी दक्षिण गोव्याच्या मुख्यालयात जन-सेवेसाठी इलेक्टेनिक घडय़ाळ दान केलेले आहे आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल पै यांच्याहस्ते बटन दाबून या इलेक्टेनिक घडय़ाळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री. गावस यांनी वरील उद्गार काढले.

काम करतो तो चुकतो या उक्तीप्रमाणे पोलीस काम करतात आणि कैकदा वरील उक्तीप्रमाणे पोलीस चुकतातही. मात्र जेव्हा चुकतात तेव्हा त्या चुकीचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, चांगले काम केले जाते तेव्हा त्याला त्याप्रमाणात तोलले जात नसल्याची खंत यावेळी पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केली. इंग्लंडमधील जनता सदोदीत पोलिसांच्या पाठीशी असते आणि म्हणूनच तेथील पोलीस आपली खासियत दाखवत असतात. मात्र भारतात असे चित्र दिसत नाही. भारतात असे चित्र दिसल्यास पोलीस खात्यातील पोलिसांचे कसब वाखाणण्याजोगे होईल.  पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाचे जनतेकडून कौतूक झाल्यास पोलिसांचे मनोधैर्य अधिक उंचावते व ते अधिक जोमाने कार्य करु शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलिसांच्या हिताच्यादृष्टीने अनेक लहान मोठे उपक्रम केलेल्या ऍड. बांदोडकर यांची श्री. गावस यांनी यावेळी मुक्त कंठाने स्तुती केली आणि त्यांच्यातील हा हिरवेपणा सदोदीत टिकून राहूदे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी बोलताना मठग्राम हिन्दु सभेचे भाई नायक यांनी ऍड. बांदोडकर यांच्या समाजाची सेवा करण्याच्या वृत्तीचे कौतुक करुन त्यांच्यातील अनेक गुण यावेळी खुले केले.

याप्रसंगी बोलताना ऍड. बांदोडकर यांनी उद्घाटक अनिल पै यांच्या स्वभावाच्या वर्णन केले आणि सर्वाना हवा हवासा वाटणाऱया अनिल पै यांच्याहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याचा निर्णय उचित असल्याचे सांगितले.

अनिल पै यांनी यावेळी बोलताना आजचा हा कार्यक्रम म्हणजे जणू जनता- पोलीस यांच्यातील सुसंवाद असल्यासारखा असल्याचे सांगितले आणि पोलिसांनी विविध प्रसंगी केलेल्या कार्याची स्तुती केली आणि वरिष्ठ पातळीवरील पोलीस अधिकारी जेव्हा प्रमाणाबाहेर काम करतात तेव्हा कनिष्ठ पोलीस कर्मचाऱयांनाही त्यांचे अनुकरण करावेसे वाटते. आज नव्याने भरती केलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱयांच्या पेनाची धार चांगली असल्यामुळे खात्याला ते पोलीस कर्मचारी शोभून दिसतात, त्यांनी सांगितले.

यावेळी मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक राजू राऊत देसाई, मडगाव पोलीस स्थानकाचा ताबा असलेले कोलवाचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कॉश्ता व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.