|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अभयनगरमध्ये युवकावर खुनी हल्ला

अभयनगरमध्ये युवकावर खुनी हल्ला 

प्रतिनिधी /सांगली :

 जागेच्या वादातून बामणोली येथील प्रकाश धोंडीराम माळी (वय 30) या युवकावर मिरजेच्या दोघांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला केला. रविवारी रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास अभयनगर आणि अहिल्यादेवी होळकर चौका दरम्यान रस्त्यावर ही घटना घडली. यामध्ये प्रकाश गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, प्रकाश धोंडिराम माळी याने गतवर्षी मिरजेत एकाला मारहाण केली होती. त्याबद्दल मिरज शहर पोलीस ठाण्यात प्रकाशवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री प्रकाश सांगलीतून बामणोलीकडे जात असताना अभयनगर येथे नजीर नरूद्दीन रोहिले (वय 26 रा. मिरज) याने साथीदारासह त्याच्या आडवी दुचाकी मारली. दोघांनी त्याला बेदम मारहाण केली. नजीरने त्याच्या पाठीत तलवारीने वार केला. तर साथीदाराने बांबूने डोक्यात वार केला. प्रकाशने नजीरच्या वडिलांना गतवर्षी मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठीच नजीरने मारहाण केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. नजीरसह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.