|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेतील दोन मटकेवाले तडीपार

मिरजेतील दोन मटकेवाले तडीपार 

प्रतिनिधी /सांगली :

 मिरज शहरातील दोघा सराईत मटका एजंटांना सांगली जिल्हय़ातून तडीपार करण्यात आले आहे. बाबू बिलाल पटेल वय 53 रा.स्वामी समर्थ कॉलनी, मालगाव रोड आणि शमशुद्दीन अब्दुलगणी मुल्ला वय 48 रा.लक्ष्मी मार्केट मिरज अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी सोमवारी हे आदेश दिले.

  याबाबत माहिती अशी, बाबू पटेल आणि शमशुद्दीन मुल्ला हे अनेक वर्षापासून मिरज शहर आणि परिसरात मटका घेत होते. त्याप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनेक वेळा अटकही करण्यात आली आहे. तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे मिरज शहर पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर केला होता. चौकशी सुरू असतानाही त्यांचे बेकायदा मटका आणि जुगार सुरूच होते. पण, दहशतीमुळे त्यांच्याबद्दल नागरिक तक्रारीसाठी पुढे येत नव्हते. त्यांच्यामुळे मिरज शहरातील शांततेला बाधा येत असल्याने त्यांच्या तडीपारीशिवाय पर्याय नव्हता.

 त्यामुळे मंगळवारी त्यांच्या टोळीतील दोघांना तडीपार करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी दिली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राजन माने, उपनिरीक्षक  जीवन राजगुरू, विशाल भिसे, ऋषिकेश वडणीकर यांनी या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला.