|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सादरीकरणाशिवाय गॅस पुरवठा पाईपलाईनची खोदाई नाही

सादरीकरणाशिवाय गॅस पुरवठा पाईपलाईनची खोदाई नाही 

नगराध्यक्ष राहुल पंडीत

नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत खोदाईच्या मागणीचा विषय तहकूब

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरी शहरात नागरिकांना नॅचरल गॅस पुरवठा करण्याची महत्वाकांक्षी योजना मे. युनियसन प्रा.लि.मुंबई यांनी हाती घेतलेली आहे. पण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या गॅस पुरवठा योजनेबाबत योग्य ते सादरीकरण झाल्याशिवाय पाईप लाईन खोदाईसाठी परवानगी देण्याचा विषय तहकूब ठेवण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेच्या इतिवृत्तावर एकूण 11 विषय मंजूरीच्या चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. हे विषय काही मिनिटातच चर्चेसाठी ठेवून ही सभा आटपती घेण्यात आली. त्यावेळी शहरात नागरिकांना पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा करण्याच्या योजनेचा विषय मांडण्यात आला. या लोकोपयोगी योजनेसाठी मे. युनिसन प्रा.लि. मुंबई या कंपनीने एमडीपीई पाईप लाईन टाकण्यासाठी नगर परिषदेकडे परवानगी मागणी केली असल्याचे सांगण्यात आले.

शहरातील पाणीपुरवठा केला जात असताना बेकायदेशीर नळजोडण्यांमुळे नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठय़ावर परिणाम होत असल्याची तक्रार नगरसेविका राजेश्वरी शेटय़े यांनी मांडली. एका नळधारकाकडे 2 लाख 71 हजाराची घरपट्टी थकीत असल्याची तक्रार शेटय़े यांनी उपस्थित केली. तरीही या थकबाकीदाराला नळजोडणी देण्यात आली असल्याने त्यावर योग्य कारवाईची मागणी त्यांनी केली. त्या मागणीची दखल घेत नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाच्या अधिकाऱयांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील चुकीच्या व अपघातास कारणीभूत ठरणारे होर्डिंग्ज हटवण्याचे आदेशही पंडित यांनी दिले आहेत.