|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण बंदीचे संभाव्य परिणाम केंद्रासमोर गांभीर्याने मांडावेत

खाण बंदीचे संभाव्य परिणाम केंद्रासमोर गांभीर्याने मांडावेत 

प्रतिनिधी/ फोंडा

येत्या 15 मार्चपासून होऊ घातलेल्या खाणबंदीमुळे गोव्यातील रोजगार व अर्थकारणावर गंभीर परिणाम होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने येथील संभाव्य परिस्थितीची भिषणता केंद्र सरकारसमोर योग्यप्रकारे मांडून न्यायालायात त्यावर स्थिगिती मिळविण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावित, अशी मागणी मशिन, बार्ज, ट्रक व अन्य खाण अवलंबित संघटनांनी केली आहे.

या विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांची संयुक्त बैठक शनिवार फोंडा येथे झाली. या बैठकीत खाणी बंदीच्या प्रश्नावर चर्चा झाली. खाणी बंद होऊ नयेत यासाठी सर्वांनी संघटीतपणे कृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मशिन मालक संघटनेचे संदीप परब, निळकंठ गावस, महेश गावस, संजीव नाईक यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. खाण अवलंबित संघटनांचे शिष्टमंडळ येत्या दोन दिवसांमध्ये दक्षिण गोव्याचे खासदार ऍड. नरेंद्र सावईकर तसेच राज्याच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱया त्रिसदस्यीय मंत्र्याच्या समितीची भेट घेणार आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनाही निवेदन सादर करण्यात येईल. खाण बंदी लागू करतानाच गोव्यातील खाण अवलंबितावर ओढवणारी बेरोजगारी व त्यामुळे निर्माण होणारी एकंदरीत आर्थिक स्थिती यावर फेरविचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व चाळीसही आमदारांनी पुढाकार घ्यावा. केंद्र सरकारसमोर येथील परिस्थिती मांडण्यासाठी खाण अवलंबितांचे शिष्टमंडळ राजकीय नेत्यांशी चर्चा करणार आहे.

या पार्श्वभूमिवर येत्या 16 रोजी उत्तर गोव्यात तर 17 मार्च रोजी दक्षिण गोव्यात सर्व खाण अवलंबितांची जाहीर सभा होणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या दोन्ही सभांचा वेळ व स्थळ जाहीर करण्यात येईल. खाण बंदीचे परिणाम केवळ ट्रक, बार्ज किंवा मशिन मालकांना भोगावे लागणार नसून या व्यावसायाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांना त्याची झळ बसणार आहे. त्यामुळे याविरोधा सर्वांनी एकत्र येऊन जागृत होण्याचे आवाहन या सभांमधून केले जाईल. तसेच या सभांमध्ये खाणबंदीच्या प्रश्नावर पुढील कृती ठरविण्यात येणार असल्याचे संदीप परब यांनी सांगितले.