|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अन्यथा मोपा प्रकल्पाचे काम बंद पाडणार

अन्यथा मोपा प्रकल्पाचे काम बंद पाडणार 

 

प्रतिनिधी/ पेडणे

मोपा विमानतळ प्रकल्प हा पेडणेकरांच्या पोटासाठी पाहिजे असून या प्रकल्पावर स्थानिकांना अजून पर्यंत एकही नोकरी देण्यात आली नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिलेले आश्वासन जीएमआर कंपनीकडून पाळण्यात येत नाही. त्यामुळे मोपा प्रकल्पामुळे पेडणेकरांना कोणता फायदा होणार हे कराराद्वारे कंपनी सांगत नाही तोपर्यंत प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा मंत्री मनोहर आजगावकर यांनी शनिवार मोपा विमानतळ प्रकल्पावर धडक देत दिला.

शनिवारी सकाळी रेषा माशेलकर उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर आजगावकर व त्यांचे समर्थकांनी मोपा विमानतळ प्रकल्पाला भेट दिली. सुमारे 300 समर्थक यावेळी आजगावकरांच्या सोबत होते. कंपनीचे अधिकारी व कामगारांनी आजगावकर प्रकल्पाच्या ठिकाणी येत आहेत हे पाहून पळापळ सुरु केली. यावेळी मोपाचे सरपंच पल्लवी राऊळ, वारखंडचे सरपंच मंदार परब, कोरगावच्या सरपंच प्रमिला देसाई, धारगळचे सरपंच वल्लभ वराडकर, उद्योजक जीत आरोलकर, पंचसदस्य अब्दुल नाईक, कुस्तान कुयेलो, समिल भाटलेकर, स्वाती गवंडी, सीमा साळगावकर, उपसरपंच उदय पालयेकर, रंगनाथ कलशावकर, संजय तुळसकर, प्रदीप पटेकर, प्रदीप कांबळी, राकेश स्वार, सरपंच भरत गावडे, माजी सरपंच उल्हास देसाई, सरपंच संतोष मळीक, रुद्रेश नागवेकर, सुनिल नाईक, विठोबा कांबळी, प्रार्थना मोटे तसेच विविध पंचायतीचे पंचसदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री आजगावकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन तोंडी आहे. प्रकल्पाचे काम सुरु असून कामासाठी बाहेरुन कामगार आणले जातात. प्रकल्पावर वाहतुकीसाठी लागणारे ट्रक, खोदकामासाठी लागणारी यंत्रणा बाहेरुन आणली जाते. यात पेडणेकरांना काही फायदा नाही. प्रकल्पासाठी 2 कोटी चौ.मीटर जागा सरकारने ताब्यात घेतली आहे. ही जागा स्थानिकांची असून त्याचा मोबदला म्हणून स्थानिकांना रोजगार देणे गरजेचे आहे. मोपा विमानतळ हा पेडणेकरांच्या पोटासाठी पाहिजे होता मात्र आजपर्यंत कंपनीकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. जोपर्यंत पेडणेकरांसाठी नोकऱया व काय फायदा हे कंपनी सांगत नाही तोपर्यंत मोपा प्रकल्पाविरोधात आंदोलन करुन बंद पाडणार. त्यासाठी वाडय़ा-वाडय़ावर कोपरा बैठका घेऊन चळवळ उभारणार असल्याचे आजगावकर यांनी सांगितले.

यावेळी पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर, उपनिरीक्षक अनंत गावकर तसेच मोठय़ा प्रमाणात पोलीस उपस्थित होते.