|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कालव्याच्या गळतीने जमीन बनली नापीक

कालव्याच्या गळतीने जमीन बनली नापीक 

प्रतिनिधी / दोडामार्ग:

2008 पासून ते अद्यापपर्यंत कालव्याला लागलेली गळती बंद करा, अशी मागणी कालवा विभागाकडे करुनही अद्यापही प्रतिदिन लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परिणामी कुडासे येथील शेतकरी गोविंद रावजी देसाई यांची एकरभर जमीन नापीक झाली आहे. एका ठिकाणी पाणी जपून वापराचा संदेश व दुसऱया ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. पत्रव्यवहार करुनही कालवा विभागाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

आभाळ फाटले तर ठिगळ लावायची कुठे, अशी अवस्था तिलारी कालवा विभागाची झाली आहे. एका ठिकाणी धरण पूर्ण झाले म्हणून ऑफिस हलवायची. दुसऱया बाजूने मात्र शेतकऱयांच्या समस्येकडे ढुंकूनही पहायचे नाही, अशाप्रकारची भोंगळ कारभाराची अवस्था कालवा विभागाच्या कामकाजावरून दिसते. तिलारी कालव्यांना जागा देणाऱया शेतकऱयांना पाझरणाऱया पाण्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागते आहे. कुडासे वानोशी येथील गोविंद रावजी देसाई यांच्या सामायिक मालकीच्या सर्व्हे नं 158-1 आणि 159-1 मधून कालवा गेला आहे. यामध्ये 250 हून अधिक काजू कलमे व एकरभर भातपीक घेण्यायोग्य जमीन आहे. मात्र, 2008 पासून या ठिकाणच्या कालव्याला गळती लागून सगळय़ा जमिनीत पाणी साचून पाणथळ जमीन झाली. परिणामी जमीन नापीक झाली आहे.

पत्रव्यवहार करून तब्बल 10 वर्षे गळती बंद करूच म्हणतात

कालवाबाधित देसाई कुटुंबियांनी कालवा विभागाकडे 2008 पासून पत्रव्यवहार सुरू केला. मात्र, अधिकारी आपणाला काही पडलेलेच नाही, अशा भूमिकेत आहेत. याचा नाहक त्रास शेतकऱयाला बसत असून 10 वर्षांपासून उत्पन्न घेता येत नाही.

पाणी वाचवा…, कालवा विभाग मात्र….!

शासन पाणी वाचविण्यासाठी प्रबोधन करते. दुसऱया बाजूला शासनाचेच प्रतिनिधी पाण्याचा कसा अपव्यय करतात, याचे या प्रकारातून उदाहरण देत आहेत.