|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 458 उमेदवारांची प्राथमिक चाचणी

458 उमेदवारांची प्राथमिक चाचणी 

पोलीस भरती : 28 पुरुष, दोन महिला प्राथमिक फेरीतच अपात्र : 767 उमेदवारांची पाठ

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील 71 रिक्त पदांच्या भरतीसाठी सोमवारपासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहाटे चार वाजल्यापासूनच उमेदवारांनी सिंधुदुर्गनगरीत गर्दी केली होती. मात्र पहिल्या दिवशी बोलावण्यात आलेल्या 1 हजार 225 उमेदवारांपैकी 419 पुरुष व 39 महिला अशा एकूण 458 उमेदवारांनी भरतीसाठी उपस्थिती दर्शविली. उपस्थित उमेदवारांपैकी 28 पुरुष व दोन महिला असे 30 उमेदवार प्राथमिक शारीरिक चाचणीत अपात्र ठरल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 जिल्हा पोलीस दलाच्या 31 डिसेंबर 2018 पर्यंत रिक्त होणाऱया 71 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया सोमवारी पहाटेपासून सुरू झाली. 71 जागांसाठी एकूण 10 हजार 176 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बॅण्डमन पदांसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. या सर्व भरती प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हीडिओ कॅमेरे व ड्रोन कॅमेऱयाद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात पहिल्यांदाच डिजिटल प्रक्रियेद्वारे भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आलेल्या 1 हजार 225 उमेदवारांपैकी 419 पुरुष व 39 महिला असे एकूण 458 उमेदवार भरतीसाठी उपस्थित राहिले. खरं तर 93 महिला व 1,132 पुरुष उमेदवारांना भरतीसाठी बोलावण्यात आले होते. पण केवळ 458 उमेदवारांनीच प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली, तर तब्बल 713 पुरुष व 54 महिला उमेदवारांनी या भरती प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे निदर्शनास आले.

महाऑनलाईनकडून 14 मार्च 2018 रोजीच्या सकाळच्या सत्रापर्यंतच्या उमेदवारांचे हजेरीपट पोलीस प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. तर 14 मार्च 2018 दुपारचे सत्र व 15 मार्च 2018 रोजीच्या दिवसभराच्या सत्रातील उमेदवारांचे हजेरीपट अद्याप महाऑनलाईनकडून प्राप्त व्हायचे आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या हजेरीपटामध्ये उमेदवारांची नावे आहेत किंवा नाहीत, या बाबत माहिती घ्यायची असल्यास सिंधुदुर्ग नियंत्रण कक्षातून माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

शेकडो उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागाच्या प्रतीक्षेत

 महाऑनलाईनकडून शेकडो उमेदवारांना अद्याप हॉल तिकिट प्राप्त न झाल्याने प्रत्यक्ष भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता आले नाही. त्यामुळे पहिल्या दिवशीच्या भरती प्रक्रियेसाठी अनुपस्थित राहणाऱयांची संख्या वाढली आहे. मात्र उपस्थित असूनही महाऑनलाईनच्या घोळामुळे भरती प्रक्रियेत सहभागी होता न आल्याने अनेक उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे.

कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाहीजिल्हा पोलीस अधीक्षक

महाऑनलाईनकडे ज्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत आणि ज्यांचे अर्ज वैध आहेत, अशा सर्व उमेदवारांना भरती प्रक्रियेत निश्चितपणे संधी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, असे जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.